
महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणुकीतील खर्चाबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत. काही मतदारसंघात एक-दोन तर काही ठिकाणी तीन-तीन कोटी रुपये खर्च करावे लागतात आणि जेवणावळींसाठी 100-100 बोकडं द्यावी लागतात, इतक्या खर्चामुळे कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत युती केली जाते पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यावेळी आपण त्यांना वाऱयावर सोडतो, असे आमदार गायकवाड म्हणाले. कार्यकर्त्यांना खर्च झेपत नाही, मग त्यांनी मातीत जावे का, असे गायकवाड म्हणाले. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटावर टीका होऊ लागली आहे.
खोके आणि बोक्यांची सवय लागलेले दुसरं काय बोलणार – वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर टीका केली आहे. ‘खोके आणि बोक्यांची (बोकड) सवय लागलेल्यांच्या तोंडून दुसरे काय निघाणार. त्यांच्या पोटातले ओठावर आले. संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो. आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलीत, किती कोटी जमा केले, किती कोटी वाटणार आहेत, नेमके तीन कोटी देतो की पाच कोटी, 100 बोकडं देतो की 200 बोकडं, यावर निवडणूक आयुक्तांना लक्ष ठेवावे लागेल.’ असे वडेट्टीवार म्हणाले.