ईडीच्या भितीने पळून गेलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50 हजार कोटी पडतील – संजय राऊत

पीएम केअर फंडात महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपये गेले, ते पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच ईडीच्या भितीने पळून आलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी कॅबिनेटमध्ये 50 हजार कोटी पडतील असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशमध्ये जिथे भाजपचं राज्य होतं. तिथे कोव्हिड काळात अनागोंदी अराजक माजलं होतं. ज्या गंगेच्या किनाऱ्यार तुम्ही आता कुंभमेळा केला ती गंगा कोविडमध्ये बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे सगळ्यांनी पाहिलं. फडणवीसांनी ते फोटो पहावेत आणि मग महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करा. फडणवीसांनी हे स्विकारत का नाही. भाजपचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. लडाखमध्ये दंगल झाली, दुसऱ्यावर दोष. तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत मग वांगचूक यांना का अटक करताय? हे भाजपचं धोरण कायम राहिल. प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे, तीन चार वर्षांपूर्वी कोविडमध्ये काय झालं हे विषय नाही. पीएम केअर फंडात किती पैसे आहेत हे मुख्यमंत्री फडणवीसांना माहित आहे का? नसेल तर मी सांगतो. महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली, मुंबईतल्या फक्त फार्मा कंपन्या यांनी किती लाख कोटी दिलेत माहिती आहे का? देवेंद्र फडणवीसांना माहिती नसेल तर मी आकडा सांगतो. पीएम केअर फंडात महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपये गेले. ते पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, कर्जमुक्त करण्यासाठी आम्ही मागणी केली तर चुकीचे काय. फडणवीसांनी पंजाब सरकारकडे पाहिलं पाहिजे. त्यांनी हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत दिली आहे. त्यांनी वाहून गेलेलं घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे. फडणवीस काय करत आहेत. ही राज्य करण्याची पद्धत नाही फडणवीस. आधी राज्य करायला शिका. प्रशासन म्हणजे सूडाचे राजकारण नाही. रामभाऊ म्हाळगीमध्ये तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. तुम्हाला हवं असल्यास आम्ही माणसं पाठवू. तुम्ही भविष्यावर बोला. या राज्याला भविष्य नाही. तुम्ही या राज्याचे वर्तमान खराब केलं आहे. शेतकरी बोलायला उभा राहिला तर तुम्ही त्यांची तोंड बंद केली आणि म्हटलं की राजकारण करू नका. हक्क मागणं हे काय राजकारण आहे का? सोनम वांगचूक बेरोजगारांचे हक्क मागत आहे हे राजकारण आहे का? भ्रष्टाचार मुक्तीची तुम्ही भाषा करायचे. ईडीच्या भितीने जे पळून आलेत, जे भ्रष्टाचारी तुम्ही बाजूला बसवलेत त्यांचे खिसे जर झटकले तर कॅबिनेटमध्ये 50 हजार कोटी तिथेच पडतील असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी, वाहून गेलेली घरं बांधून मिळावी आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी ही आमची मागणी आहे. यात राजकारण कुठे आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वतः विरोधी पक्षनेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केल्या आहेत हे त्यांनी स्वतः टेप लावून ऐकाव्यात असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एक वाजता पत्रकारांशी, माध्यमांशी संवाद साधतील. उद्या नरेंद्र मोदी येत आहेत, अमित शहा येत आहेत. मराठवाड्यात कोण जाणार? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार? मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार असतील तर मोदी आणि शहांच्या स्वागतासाठी आम्ही जाऊ.

भाजपला मुंबई गिळायची आहे. भाजपला मुंबईतून शिवसेना आणि मराठी माणूस संपवयाची आहे, म्हणून एकनाथ शिंदेंना त्यांनी पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. शरद पवार यांना संपवायचं आहे, अजित पवार त्यासंदर्भात त्यांचं हत्यार आहे. त्यांना महाराष्ट्राची, मराठी माणसाची फार काळजी आहे असं नाही. एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाहीत. आम्ही मूळ शिवसेना आहोत, आम्ही ठरवायचो कुणाला किती जागा द्यायच्या. आता हे मिंधे आश्रितासारखे जातात आणि म्हणातात की आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या. कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहांची बेनामी कंपनी आहे. शिंदेंच्या तोंडावर 5-25 जागा फेकून मारल्या जातील. आणि त्यांना सांगतील की तुम्ही मराठी माणसांची मतं फोडा. ही सुपारी आहे. हे सुपारीबाज लोकं आहेत, सुपाऱ्या देतात, सुपाऱ्या घेतात आणि महाराष्ट्राचं नुकसान करतात.

2014 साली ज्या भाजपने मूळ शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडली त्यावरून भाजपवर विश्वास ठेवणं कठीण आहे. भाजप हा स्वतःचाही राहिलेला नाही. तो त्यातील एक दोन गटांचा आहे.

दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आहे, याबाबत आम्ही उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली. पण शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही असे ठरले. मराठवाड्यातला शेतकरी हा चिखलातच आहे. दसरा मेळाव्यासाठी दोन तीन तासांसाठी आम्ही जमू आणि हा मेळावा करू यावर आमचे शिक्का मोर्तब करू.

2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे काय वाढून ठेवलं आहे माहित नाही. 2029 साली केंद्रात राहुल गांधी यांच सरकार येणार आहे. खरंतर ते याचवेळी आलं असतं. पण वोट चोरी चे प्रकरण सातत्याने बाहेर येत आहे, त्यामुळे लोकसभेच्या 50 ते 55 जागा आणि इतर काही जागा या लोकांनी कशाप्रकारे चोरून मोदी सरकार आणलं. आताही त्यांच्याकडे बहुमत नाही. आणि 2029 पर्यंत मोदींचं सरकार राहण्याची शक्यता आम्हाला कमी वाटते. हे मी जबाबदारीने बोलतोय. 2029 पर्यंत त्यांना महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते म्हणून रहावं लागेल असेही संजय राऊत म्हणाले.