संजय राऊत यांचा नितेश राणेंविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा, न्यायालयाने बजावले वॉरंट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. राऊत यांच्या दाव्याची माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने समन्स बजावूनही अनुपस्थित राहणाऱ्या नितेश राणे यांना न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावलं. तसंच पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश दिले.

नितेश राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्याची दखल घेऊन न्यायालयाने राणे यांना 16 ऑक्टोबर रोजी समन्स बजावलं होतं. मात्र, न्यायालयाने समन्स बजावूनही न्यायालयात राणे अनुपस्थित होते. त्यामुळे राणे यांना न्यायालयाने वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान राणेंना हजर राहून जामीन मिळवावा लागणार आहे. या सुनावणी दरम्यान नितेश राणे यांच्याकडून समन्स अद्यापही मिळालं नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र, स्पीड पोस्टद्वारे समन्स पाठवण्यात आल्याची माहिती न्यायालयाने त्यांना दिली. जर एक महिना उलटूनही समन्स मिळालं नाही तर आता हे वॉरंट आपण राणे यांच्या कणकवली येथील घरी स्पीड पोस्टद्वारे पाठवणार असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं.