‘राऊत सरां’नी घेतला पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा ‘क्लास’

1335
sanjay-raut

क्राइम रिपोर्टर ते संपादकापर्यंतची वाटचाल, संपादक ते शिवसेना नेते, राज्यसभेचे खासदार, ‘सामना’चे अग्रलेख, सामना आणि शिवसेना, महाराष्ट्रातील नव्याकोऱ्या महाआघाडी सरकारचा प्रयोग या आणि अशाच अनेक विषयांवर संजय राऊत यांनी आज पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. निमित्त होते पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग (रानडे इन्स्टिट्यूट)च्या विद्यार्थ्यांशी साधलेल्या मनमोकळ्या संवादाचे.

रमा नाईकच्या एन्काऊन्टरची सनसनाटी स्टोरी करून संजय राऊत यांनी त्याकाळी मुंबई आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली होती. क्राइम रिपोर्टर ते शिवसेना आणि ‘सामना’ला दररोज चर्चेत ठेवणारे सिद्धहस्त संपादक असा आपला पत्रकारितेचा प्रवास खासदार राऊतांनी उलगडला.

महाविकास आघाडीचे सरकार टिकेल, चालेल!
राज्यात सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार आता कोसळेल, नंतर कोसळेल, अशी भविष्यवाणी विरोधी पक्षातले नेते करत आहेत. मात्र ही भविष्यवाणीच राहील आणि महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदुत्वावर कायम; पोटापाण्याचेही प्रश्न महत्त्वाचे
महाविकास आघाडीत असल्याने शिवसेनेचे हिंदुत्व सौम्य झाले आहे, अशी टीका होत असताना सौम्य म्हणजे काय आणि जहाल म्हणजे काय, असा प्रतिसवाल करत शिवसेना हिंदुत्वावर कायम आहे. मात्र, पोटापाण्याचेही प्रश्न महत्त्वाचे आहेत. पोटाला जात आणि धर्म नसतो. शिवथाळी ही त्याच उद्देशाने सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेचे प्रश्न सोडवणे हे सरकारचे काम असते. आमचे सरकार तेच करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

वृत्तपत्राचे महत्त्व कायम राहील
सध्याचा जमाना इलेक्ट्रॉनिक आणि वेब पोर्टलचा असला तरी, वृत्तपत्राचे महत्त्व यापुढेही कायम राहील. वर्तमानपत्राची विश्वासार्हता अजूनही कायम असल्याचे खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वास दाखविला, संधी दिली. त्यामुळे इथवर येऊन पोहोचलो. पत्रकारितेत टिकायचे असेल तर पॅशन दाखवायला हवे. त्यामुळे कमिटमेंट ठेवून पॅशन समजून काम करा, यश तुमचेच आहे, असा कानमंत्रही संजय राऊत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी वृत्तपत्र विभागाच्या प्रा. उज्ज्वला बर्वे व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या