संविधान, लोकशाहीच्या रक्षणासाठी; शेतकरी-कष्टकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी ‘मविआ’ 48 जागांवर एकत्र लढेल! – संजय राऊत

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा घटक पक्ष आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्षा अशांची जी महाविकास आघाडी आहे त्यांच्यात काल 48 जागांवर चर्चा पूर्ण झाली. कोण कुठून लढू शकेल याचा साधारण आराखडा ठरला असून कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत. देशातील संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी, शेतकरी-कष्टकरांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्रातील 48 जागांवर लढू हा आमचा निर्णय पक्का आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते गेल्या काही बैठकात हजर असून काल त्यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे. त्यांना 27 जागा लढवायच्या नाही तर त्या जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. अशी तयारी प्रत्येक पक्ष करतो. वंचितने 27 जागांवरची स्थिती काल दिली असून त्याच्यावर चर्चा करून काही निर्णयही झाले आहेत. देशाच्या हुकुमशाहीविरुद्ध वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अत्यंत प्रभावीपणे उभा ठाकलेला आहे. महाराष्ट्रात, देशात संविधानासंदर्भात जी मोडतोड सुरू आहे त्या संदर्भात आंबेडकरांची भूमिका स्पष्ट असून तीच महाविकास आघाडीची भूमिका आहे, असेही राऊत म्हणाले.

यवतमाळच्या सभेतून तत्कालिन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. पंतप्रधानांच्या आधीच्या वक्तव्यांची आठवण करून देत राऊत यांनी त्यांना टोला लगावला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान खोटं बोलतात. त्यांनी खोटं बोलू नये. पंतप्रधानांनी आपली आधीची वक्तव्य आठवायला हवीत. शरद पवार देशातचे उत्तम कृषीमंत्री होते. युपीए सरकारने गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याशी असहकाराची भूमिका घेतली होती तेव्हा शरद पवार यांनीच गुजरातला कृषी, सहकार या संदर्भात आवर्जुन मदत केली होती. राजकारणाच्या पलीकडे जाऊ मोदींनीही वारंवार जाहीरपणे हे सांगितले आहे. पण एखाद्या गावात येऊन त्यांना निवडणुकीसंदर्भात खोटं बोलायचं असेल तर बोलू द्या.

शरद पवारांचे बोट धरून मी राजकारण आलो. शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत असे मोदींनी याआधी सांगितले होते. मोदींनी असेही म्हटले होते की महाराष्ट्र आणि देशातील सर्वात मोठा घोटाळा कोणता असेल तर तो आदर्श घोटाळा आहे. पण आज त्याच आदर्श घोटाळ्यातील सूत्रधाराला त्यांनी आपल्या पक्षात घेऊन राज्यसभा दिली. मोदी असेही म्हणाले होते की महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्याला सोडणार नाही. पण त्याच सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतले आणि उपमुख्यमंत्री केले. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवावा अशी महाराष्ट्र आणि देशाची मानसिकता आहे, असेही राऊत म्हणाले.

गुजरातमधील बंदरावर सापडलेल्या हजारो कोटींच्या ड्रग्जप्रकरणावरही राऊत यांनी भाष्य केले. गुजरात हे विकासाच्या मार्गावर पुढे असून गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असे पंतप्रधान मोदी वारंवार सांगतात. याचा अर्थ इतर राज्य त्यांच्या तुलनेत महत्त्वाची नाहीत. मुंबईसह राज्यातील अनेक प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले. त्याचबरोबर जगातला ड्रग्जचा व्यवहार आणि व्यापारही त्यांनी गुजरातला नेला. गेल्या काही काळापासून हजारो कोटींचे अंमली पदार्थ फक्त गुजरातच्या बंदरावर येतात, उतरवले जातात. संपूर्ण देशातील तरुणी पिढी नासवण्याचा प्रकार गुजरातच्या भूमितून होत असेल तर मोदींनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा देशाच्या गृहमंत्र्यांनी गुजरातमध्येच हजारो कोटींचे ड्रग्ज का उतरतंय याच्यावर मार्गदर्शन करावे. नाशिक, पुणे, मुंबईत ज्याप्रकारे ड्रग्जचा फैलाव झालेला आहे, हे सगळे ड्रग्ज गुजरातच्या मार्गाने महाराष्ट्रात पोहचतंय. गुजरातचा उडता गुजरात झाला आहे, पण त्यांना महाराष्ट्राचाही उडता महाराष्ट्र करायचा आहे का? असा सवालही राऊत यांनी केला.