फडणवीस, पवार यांचा शिंदेंच्या हाताखाली काम करण्यास नकार; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Pc - Abhilash Pawar

महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व अशा चेहऱ्याने करावे जे प्रत्येक घटकाला मान्य असेल यावर शरद पवार, राहुल गांधी यांचेही एकमत होते. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर नको अशी भूमिका सर्वात आधी अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली. आम्ही सीनियर असून ज्यूनियरच्या हाताखाली काम करणार नाही ही त्यांची भूमिका होती. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचाही शिंदेंच्या नावाला विरोध होता, असा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.

2019 ला मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. तेव्हाही विधिमंडळपदाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती. मुख्यमंत्रीपदासाठीही शिवसेनेकडून शिंदे यांचेच नाव पुढे गेले असते. पण भाजपच्या वरिष्ठांनी जे आता मंत्रिमंडळात आहेत त्यांनी निरोप पाठवला की दिल्लीचा निर्णय काय होईल तो होईल, पण आम्हाला मुख्यमंत्रीपदावर शिंदे चालणार नाहीत. फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची हीच भूमिका होती, असे संजय राऊत म्हणाले.

शिंदे तेव्हा कोणालाच नको होते. कारण त्यांचा वकुब नव्हता, अनुभव कमी होता आणि पैसा फेको, तमाशा देखो ही त्यांच्या कामाची पद्धत असल्याने ते आपल्या आसपास किंवा त्यांनी राज्याचे नेतृत्व करू नये, पैशाचा व्यवहार करणे, व्यापार करणे म्हणजे नेतृत्व नाही ही भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका होती. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी दिल्लीतून जो निर्णय येईल तो मान्य करू अशी भूमिका भाजपची होती. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे की नाही हा पुढचा विषय होता, पण जर तसे झाले तर आम्हाला शिंदे चालणार नाहीत अशी भूमिका भाजपने घेतली होती, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

हे वाचा – नितीन गडकरी गेले कोणीकडे? महायुतीच्या सभेला अनुपस्थित असल्याने सोशल मिडीयावर चर्चेला उधाण

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांसह भाजप मुख्यालयात जाणार असून एकएक अटक करण्याऐवजी सर्वांना एकदाच अटक करा असे आव्हान त्यांनी दिले आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. सरकार 4 जूनला बदलणार असले तरी सत्ताधाऱ्यांची मस्ती कमी झालेली नाही. आजही दिल्लीपासून मुंबईपर्यंत विरोधकाना धमकावले जात आहे. शिवसैनिकांनी मुलुंडमध्ये चोरीचा पैसा पकडला, तो वाचवण्यासाठी स्वत: गृहमंत्री आले. हा कोणता कायदा आहे? दिल्लीत आणि इतर राज्यातही हेच चालू आहे, असे राऊत म्हणाले. तसेच ईडीने इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणात भाजपवर आरोपपत्र दाखल केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

‘वोट जिहाद’ला ‘वोट यज्ञ’ करून उत्तर देऊ असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही राऊत यांनी समाचार घेतलाच. निवडणुकीनंतर हिमालयात जाऊन यज्ञच करायचा आहे, किंवा केदारनाथला जाऊन पुजा-अर्जा, घंटा बडवत बसायचे आहे. राज्य आम्ही करू, त्यांनी पुजा-अर्जा,यज्ञ करत बसावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. तसेच पुन्हा सरकार आल्यावर 6 महिन्यात पीओके ताब्यात घेऊन अशी वल्गना करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. 6 महिन्यात पीओके ताब्यात घेऊ म्हणणारे 10 वर्ष घंटा बडवत बसले होते का? असा सवाल करत राऊत म्हणाले की मोदी सरकार कश्मिरी पंडितांची घरवापसी करू शकलेले नाही. पण इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ.