
देशाचं वाटोळं करण्यात मोदी-शहांचे ‘भारतरत्न’ ज्ञानेश कुमार यांचा मोठा वाटा असल्याची घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हवण्यासाठी प्रस्ताव आणणार आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
मंगळवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “या देशाचे वाटोळे करण्याचे काम ज्या चार संवैधानिक संस्थांनी केले आहे, त्याच्यात मोदी-शहांचे भारतरत्न ज्ञानेश कुमार यांचा फारमोठा वाटा आहे. ते काल कोलकाता विमानतळावर उतरले आणि एखाद्या अभिनेत्याप्रमाणे, नेत्याप्रमाणे जनतेला हात करत गेले. बाहेर त्यांना पाहायला कोण आले होते?”
‘गो बॅक ज्ञानेश कुमार’, बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जोरदार नारेबाजी
‘नरकातले स्वर्ग’ पुस्तक इंग्रजीत
दरम्यान, संजय राऊत यांनी लिहिलेले ‘नरकातले स्वर्ग’ हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित होत आहे. 23 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील मावळणकर हॉलमध्ये हा सोहळा होत आहे. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविद केजरीवाल हे देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
अहवाल आल्यावर पाहू हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात; पण…
अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार संशय व्यक्त करत आहेत. मात्र याबाबत सुनेत्रा पवार यांनी आवाज उठवला पाहिजे. तपास यंत्रणेचा अहवाल येऊ द्या मग पाहू, हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात. पण एक पत्नी बोलू शकत नाही, जिने आपला पती गमावला आहे. स्वत: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळात हा विषय उपस्थित केला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
सरकारमध्ये असूनही सीबीआय चौकशीसाठी इतका वेळ का लागतो या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, याचा अर्थ असा आहे की हा अहवाल स्वच्छ नाही. या प्रकरणामध्ये विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय हे रोहित पवार वारंवार सांगताहेत त्यात तथ्य दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमी म्हणतात ना माझा जीवाभावाचा मित्र गमावला, मग लपवता कशाकरता? व्ही. के. सिंह हा भाजपचा सदस्य आहे का? त्याने निवडणुका लढवायला पैसे दिलेत का? असा सवालही राऊत यांनी केला.

























































