शिवतीर्थावर शिवसेनेचा, तर नागपुरात RSS चा; हे दोनच दसरा मेळावे, इतर सर्व चोरबाजार, संजय राऊत यांचे परखड मत

महाराष्ट्रात दोनच दसरा मेळावे आहेत. एक दसरा मेळावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि दुसरा शिवसेनेचा शिवतीर्थावर. आधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. या दोन्ही मेळाव्याकडे देशातील जनतेचे कायम लक्ष लागलेले असते. इतर सर्व चोरबाजार असून निवडणूक आयोग, भाजप, मोदी-शहा सोडले तर त्यांना कुणी शिवसेना मानत नाही, असे परखड मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

सहा दशकांपासून महाराष्ट्राची परंपरा बनलेला शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असून ते शिवसैनिकांना कोणता विचार देतात आणि अतिवृष्टीसह विविध प्रश्नांवरून राज्यकर्त्यांवर कसा आसुड ओढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मिंधे गटाचाही मेळावा होणार आहे. याच संदर्भात प्रश्न विचारला राऊत म्हणाले की, शिवसेनेचे दोन नाही एक मेळावा होतो. चोर बाजारात खूप माल विकायला असतो. मुंबईत एक चोर बाजार आहे, दिल्लीत एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी त्यांचा तिसरा चोर बाजार काढला आहे. त्या चोर बाजारामध्ये राजकारणातील चोरीचा माल विकायला ठेवला आहे. त्यांना जनता शिवसेना मानत नाही.

निवडणूक आयोग सोडला आणि मोदी-शहा, भाजप सोडले तर त्या दुसऱ्या गटाला शिवसेना कुणी मानणार नाही. प्रचंड पैशांचा वापर करून लोक आणले जातात आणि म्हणे आमचा मेळावा. अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही शिवसेना कधी स्थापना केली? तुम्ही या महाराष्ट्राला काय विचार दिला? तुमचा जन्म कधीचा आहे? बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुमचे वय काय होते? तुम्ही कुठल्या गोधडीत रांगत होतात? असा सवालही राऊत यांनी केला.

मिंध्यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंना भगव्या शालीत दाखवण्यात आले आहे. यावरूनही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ते स्वत:ला बाळासाहेब ठाकरेच समजायला लागले आहेत. पण बाळासाहेब सामान्यांचे, बहुजन समाजाचे, मराठी माणसाचे पुढारी होते. बाळासाहेबांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, आपल्या भूमिका कधी अर्पण केल्या नव्हत्या. बाळासाहेब ठाकरे हे निर्णय कोणते घ्यावे यासाठी अमित शहा, मोदी यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते. शिंदेंचा गट पावसाळ्यातील गांडुळासारखा आहे. मोदी-शहा राजकारणातून जातील तेव्हा हे गांडुळाप्रमाणे नष्ट होतील. तोपर्यंत त्यांना दसरा, गुढीपाडवा साजरा करू द्या. जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अर्पण करताहेत, तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील, असेही संजय राऊत म्हणाले.

शिवतीर्थावर घुमणार ठाकरेंचा आवाssज! उद्या शिवसेनेचा अभूतपूर्व दसरा मेळावा

आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो असा दावा करणाऱ्यांनाही राऊत यांनी फटकारले. बाळासाहेबांचा विचार त्यांना माहिती असता तर दिल्लीची बुटचाटेगिरी केली नसती, महाराष्ट्रात जे मराठी माणसाचे अध:पतन चालले आहे त्याकडे लक्ष दिले असते. मुंबई, महाराष्ट्रात बिल्डर, ठेकेदारांचे राज्य आणले नसते. शहा-मोदींची जी हुजुरी केली नसती. बाळासाहेबांचे नाव घेण्याची त्यांची कुवत नाही. कुवत ही मनाची, मेंदुची असते. मनाची कुवत यासाठी नाही की ईडी, सीबीआयला घाबरून यांनी पक्षांतर केले आणि मेंदुची कुवत यासाठी नाही की त्यांना बाळासाहेब, शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही. त्यामुळे उद्याचा जो मेळावा होणार तिथे पैशाचा धूर निघणार फक्त, असेही राऊत म्हणाले.