
शिवतीर्थावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षचा अतिविराट दसरा मेळावा गुरूवारी झाला. तुफान पाऊस आणि चिखल असतानाही निष्ठावंतांनी शिवतीर्थावर गर्दी केली होती. पावसातही लोक हटले नाहीत. लोक ठामपणे उभे होते. हे चित्र महाराष्ट्राचे राजकीय झलक दाखवणारे आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, सभा सुरू असताना पाऊस येणे आणि त्या पावसात विचलित न होता नेत्याने भाषण करणे हे अनेकदा झाले आहे. शरद पवार यांचे पावसातील भाषण फार गाजले होते. पण कालचा शिवतीर्थावरचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीने ऐतिहासिक आणि महत्त्वाचा होता. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस पडत होता. पाऊस येणार आणि शिवतीर्थावर पाणी, चिखल होणार याची पूर्ण कल्पना असताना उद्धव ठाकरे यांनी आमच्याची चर्चा केली. तेव्हा आम्ही ठरवले की परंपरा सोडायची नाही. अख्खा मराठवाडा, चिखलात आहे. अशावेळी आपण पाऊस, पाण्याचा घाबरून बाहेर पडलो नाही तर ते चुकीचे आहे. आपण शिवतीर्थावरच मेळावा करावा.
कालही पाऊस पडत होता. त्या पावसात सभा झाली. त्या मेळाव्यामध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते. हे चित्र महाराष्ट्रातील राजकीय झलक दर्शवणारे आहे. लोक मुंबई किंवा राज्यातील इतर महापालिकांसाठी तयारीने आले होते. पावसामधून लोक हटले नाहीत, ठामपणे उभे होते. त्या पावसामध्ये पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण पूर्ण केले. उद्धव ठाकरे पावसामुळे भाषण संपवण्याच्या मनस्थितीत होते, तेव्हा समोरून थांबू नका, बोला अशा घोषणा येत होत्या. हे भाग्य आणि पुण्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळू शकते. हे फक्त ठाकरे कुटुंबासाठीच आहे, बाकी कुणासाठी नाही, असेही राऊत म्हणाले.
राज ठाकरे आणि शिवतीर्थाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्या विषयी आमच्या भावना, संवेदना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम, आस्था, मैत्री, नाते, जिव्हाळा कायम ठेवले म्हणून आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो. एकत्र बसू शकलो, चर्चा करू शकतोय. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकमेकांबाबत जाहीरपणे बोलू शकतात.
शिवतीर्थावर निष्ठेचा महासागर… पावसाची पर्वा न करता दसरा मेळाव्याला शिवसैनिकांची अलोट गर्दी
मी नक्कीच म्हणालो की, शिवतीर्थावर सभा होत आहे. हे शिवतीर्थ आपले आणि या शिवतीर्था पलीकडे शिवतीर्थ आहे. त्याच्याशी सुद्धा आपले नाते आहे. लोकांना हे नाते अधिक दृढ करायचे आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी या विषयावर संवाद साधला, तेव्हा समोरून जो प्रतिसाद होता तो आपण पाहिला. युतीची घोषणा का केली नाही हा प्रश्न पुढले काही दिवस विचारला जाईल. काल उद्धव ठाकरे यांनी काय सांगितले त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. दोन्ही बाजूने मनाची पूर्ण तयारी आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
भाजपवाले समर्पयामी म्हणत मुंबई अडाणीच्या चरणावर घालतील! उद्धव ठाकरे यांचे खणखणीत आणि दणदणीत तडाखे