नाशिक महापालिकेतील 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळय़ाचा पर्दाफाश, संजय राऊत यांचा पुराव्यांसह गौप्यस्फोट

नाशिक महानगरपालिकेत 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा गौप्यस्पह्ट शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज पुराव्यांसह केला. हा घोटाळा नाशिकमधील बिल्डर ठक्कर, मनवानी आणि शाह यांनी केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घोटाळय़ाचे मुख्य लाभार्थी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) याप्रकरणी चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा. तसेच हे मनी लॉण्डरिंगचे प्रकरण असल्याने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सोपवण्यात यावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. या घोटाळय़ाची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवत याप्रकरणी काय कारवाई करणार, असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली. नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून तिथे लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे. नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिक शहर दत्तक घेतो, अशी घोषणा 2017 साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केली होती, परंतु पाच वर्षांच्या सत्ताकाळात नाशिक महापालिकेची फक्त लूट झाली, अशी टीका करत संजय राऊत यांनी संपूर्ण प्रकरणाची कागदोपत्री पुरावे आणि छायाचित्रांसह माहिती दिली.

संजय राऊत यांनी सांगितले की, 2020 ते 2022 या काळात नाशिकच्या विकासासाठी आरक्षित जमिनीच्या संपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला गेला. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 175 कोटी रुपयांची भूसंपादनाची कारवाई करण्याची परवानगी दिली. त्यावेळी एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री होते. त्यांनी नाशिकमधील बिल्डर लॉबीचा फायदा व्हावा म्हणून 175 कोटींची परवानगी असतानाही पालिका प्रशासन, भाजपचे पदाधिकारी व मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

भुजबळांकडूनही चौकशीची मागणी

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे, मात्र त्या पत्राची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. उलट विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी क्लीन चिट देऊन टाकली असून घोटाळेबाजांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

दोन कोटींची जमीन पालिकेला 50 कोटींना विकली

ठक्कर बिल्डर हा या भूसंपादन घोटाळय़ातील सर्वात मोठा लाभार्थी असून त्याने किमान 300 कोटी रुपये भूसंपादनाच्या व्यवहारातून मिळवले आहेत. ही जनतेच्या पैशांची सरळसरळ लूट आहे. दोन कोटींची जमीन ठक्करने विकत घेऊन महापालिकेला 50 कोटींना विकली. संपूर्ण ठक्कर कुटुंब या व्यवहारात अडकलेले दिसते, अशी पोलखोलही संजय राऊत यांनी केली.

इंडिया आघाडीचे सरकार येताच या लाभार्थ्यांना तुरुंगात पाठवणार

नाशिकमधील भूसंपादन घोटाळा हा गुन्हेगारी स्वरूपाचा व्यवहार आहे. हे मनी लॉण्डरिंग आहे. मुंबई महानगरपालिकेत कोविड काळातील खिचडीप्रकरणी चौकशी होते. ईडीकडून कारवाई केली जाते. मग या मनी लॉण्डरिंगवरही कारवाई व्हायला हवी. नाही झाली तर उद्या इंडिया आघाडीचे सरकार पेंद्रात सत्तेवर आल्यानंतर या सर्व लाभार्थ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता आपल्यासोबत पत्रकार परिषदेला बसावे आणि याप्रकरणी जाब द्यावा, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.

– अनेक जमिनींचे न्यायालयात दावे सुरू असतानाही महापालिकेने त्या बिल्डरांना कोटय़वधी रुपये देऊन विकत घेतल्या.
– शेतकऱयांचे अनेक वर्षांचे भूसंपादनाचे प्रस्ताव डावलून फक्त बिल्डरांनाच फायदा देण्यात आला.
– अनेक जमिनींची मालकी बिल्डरांकडे नसतानासुद्धा महापालिकेकडून त्यांनी कोटय़वधींचा मलिदा घेतला.
– अनेक प्रकरणांमध्ये स्टॅम्प डय़ुटी भरलेली नाही. एक जागा विकत घेताना 47 लाखांची स्टॅम्प डय़ुटी बुडवण्यात आली आणि चार महिन्यांनी तीच जागा नाशिक पालिकेला 21 कोटींना विकण्यात आली.

मुख्यमंत्री-बिल्डर साथ साथ

या भूसंपादन घोटाळय़ातील लाभार्थी असलेले ठक्कर बिल्डर व अन्य बिल्डर्स नाशिकमधील सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसले होते, असे सांगत संजय राऊत यांनी त्याची छायाचित्रेही यावेळी माध्यमांना दाखवली. काही बिल्डरांनी त्या काळात शेतकरी नसतानाही जमिनी घेतल्या आणि एका महिन्यात त्या जमिनी पाच पटीने भाव वाढवून पालिकेकडून कोटय़वधी रुपये घेतले. अशी 27 प्रकरणे आपल्याकडे आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

काय कारवाई करणार?

नाशिकमधील भूसंपादन घोटाळा ही जनतेच्या पैशांची सरळसरळ लूट असून या घोटाळय़ाचे लाभार्थी असलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांवर काय कारवाई करणार, असा सवाल संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. संजय राऊत यांनी मोदी आणि फडणवीसांना याबाबत पत्र लिहिले असून घोटाळय़ाच्या पुराव्यांची फाईलच त्यांच्याकडे दिली आहे.

कोणाला किती मलिदा मिळाला?

ठक्कर बिल्डर

350 कोटी रुपये
मनवानी बिल्डर
53 कोटी रुपये
शहा बिल्डर
8 कोटी रुपये
इतर बिल्डर्स
200 कोटी रुपये
महापालिका
अधिकारी व क्लर्क
12 कोटी रुपये