रोखठोक – दिल्लीत अंजली, मुंबईत उर्फी! वस्त्रहरण नक्की कुणाचे?

मुंबईत उर्फी जावेदने भारतीय जनता पक्षाला कामास लावले. तिचे तोकडे कपडे, ‘पठाण’ चित्रपटामधील भगवी बिकिनी यावर भाजपची महिला आघाडी आंदोलन करते, पण दिल्लीच्या कंझावालमधील अंजलीस भाजपच्या पदाधिकाऱ्याने त्याच्या गाडीखाली चिरडून मारले यावर सरकारात व भाजपमध्ये सन्नाटा आहे! उर्फी प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण झाले. अंजली प्रकरणात भाजपचे ढोंग उघडे पडले!

महाराष्ट्रात सध्याचे राजकारण पूर्णपणे रसातळाला गेले आहे. ते इतके की, राज्यात सर्व प्रश्न संपले व कोण्या एका उर्फी जावेद या नवख्या नटीच्या तोकडय़ा कपडय़ांवर भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या बोलू व डोलू लागल्या आहेत. उर्फी जावेद या कालपर्यंत अनोळखी असलेल्या नटीने मुंबईच्या रस्त्यावर कमी कपडय़ात शूटिंग केले. त्यामुळे हिंदू संस्कृतीचे वस्त्रहरण झाले, असे भारतीय जनता पक्षाला वाटते व त्यांनी त्या उर्फीविरुद्ध तशी मोहीम सुरू केली. या सगळय़ांचा परिणाम असा झाला की, या उर्फीला प्रसिद्धी मिळाली व तिचा भाव वधारला. त्यामुळे संस्कृतीचे वस्त्रहरण नक्की कोणी केले? ते भाजपने केले. उर्फीही भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ यांच्यावर तुटून पडली. हे सर्व टाळता आले असते. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भाजप जी फौजदारी करीत आहेत ती अनावश्यक आहे. उर्फी प्रकरणात जे ‘मॉरल पोलिसिंग’ झाले ते भारतीय जनता पक्षावर उलटले आहे. उर्फी कोण? ती काय करते? या भानगडीशी सामान्य जनतेला काही पडले नाही. उर्फीने तोकडे कपडे घातल्याने बलात्कार वाढतील हा दावा हास्यास्पद आहे. महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे. ही विकृती कायद्यावरही मात करीत असते. महाराष्ट्रातील भाजप मुंबईत उर्फी प्रकरणावर लढा देत असताना तिकडे देशाच्या राजधानीत जे घडले ते धक्कादायक होते. असभ्यता व क्रूरतेचे टोक गाठणारे कृत्य भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने केले. दिल्लीतील कंझावाल परिसरात काय घडले? रात्री उशिरा येथील कमी रहदारीच्या रस्त्यावर एका भरधाव कारने स्कुटीवर बसलेल्या अंजलीस धडक मारली. त्या धडकेने अंजली स्कुटीसह खाली कोसळली. अंजलीचा पाय त्या गाडीच्या चाकात अडकला, पण त्या भरधाव कारने अंजलीस घासत-फरफटत अनेक किलोमीटर पुढे नेले. अंजली त्या गाडीच्या चाकात अडकून तडफडत होती, आक्रोश करीत होती. तिच्या संपूर्ण शरीराचा त्यात चक्काचूर झाला. देशाच्या राजधानीत ही अशी भयंकर घटना घडली. ही भरधाव कार चालवणारा, अंजलीस फरफटत नेणारा कारचालक दिल्लीतील भाजपचा पदाधिकारी होता व तो मद्यधुंद अवस्थेत होता. दिल्लीतील या भयंकर घटनेने देश हादरला. जगात आपली पुन्हा नाचक्की झाली. पोलीस व्यवस्था व पेंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे हे अपयश आहे. दिल्लीतील ‘निर्भया’प्रकरणात भाजप देशभरात रस्त्यावर उतरला. संसद चालू दिली नाही. तोच भाजप आज सत्तेवर असल्याने अंजली प्रकरणात थंड पडला. मुंबईत उर्फी जावेदच्या तोकडय़ा कपडय़ांवरून संस्कृती रक्षणाचे धडे देणाऱ्यांनी अंजलीचा आक्रोश जणू ऐकलाच नाही. अशा अनेक अंजलींनी गेल्या सात वर्षांत तडफडून प्राण सोडले. एका उर्फी जावेदचे काय घेऊन बसलात!

सोयीनुसार सर्वकाही!

सर्वच राजकीय पक्ष सोयीनुसार महिला अत्याचाराची प्रकरणे हाताळतात. मुस्लिम महिलांच्या हिजाबविरोधात भाजप अनेकदा आक्रमक झाला. चेहरा का झाकता? कोणत्या धर्माने चेहरा झाकायला परवानगी दिली? असे तेव्हा विचारले गेले व प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. या उर्फी जावेदने हिजाब अजिबात घातलेला नाही व तिने वस्त्रेही कमी घातली. भाजपला ते पसंत नाही. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात दीपिका पदुकोण हिने तोकडय़ा भगव्या वस्त्रांत रोमँटिक सीन केले. हे संस्कृतीविरोधी असल्याचे ठरवून भाजप व त्यांच्या इतर संघटनांनी ‘पठाण’वर बंदी-बहिष्कार मोहीम सुरू केली. पण हा राग दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर होता की अन्य कशावर? कारण दीपिकाने जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्या रागातून हे भगव्या बिकिनीचे प्रकरण उभे केले. कारण भाजपसंबंधित अनेक महिला व पुरुष कलावंतांनी तोकडय़ा भगव्या वस्त्रांत यापेक्षा असभ्य प्रसंग केल्याचे समोर आले त्यावर कोणीच काही बोलले नाही व ‘पठाण’ चित्रपटातील भगव्या कपडय़ांतील दृश्य सेन्सॉर बोर्डाने सरळ कापले. कारण सेन्सॉर बोर्डात भाजपने नेमलेलेच लोक निर्णय घेत आहेत.

हरयाणाचे रंगेल क्रीडामंत्री

उर्फी जावेदच्या तोकडय़ा कपडय़ांवरून संतापलेल्या सगळय़ांनी हरयाणातील क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्या प्रकरणाकडेदेखील गांभीर्याने पाहायला हवे. संदीप सिंह हे क्रीडामंत्री आहेत व त्यांच्यावर एका महिला क्रीडा प्रशिक्षकाने यौन शोषणाचा आरोप लावला आहे. महिला कोचला मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी बोलावून तिच्याशी असभ्य वर्तन केले. तिचा टीशर्ट फाडला असा या महिला प्रशिक्षकाचा आरोप आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तेथील सरकारने ‘एसआयटी’ नेमली, पण भाजपशासित राज्यातील अशा प्रकरणांवर कोणत्याही लढवय्या महिला नेत्या भांडताना दिसत नाहीत. हा दुटप्पीपणा आहे. दिल्लीतील अंजलीसारखे प्रकरण महाराष्ट्र किंवा राजस्थान, प. बंगालात घडले असते तर चित्र वेगळेच झाले असते. हरयाणातील भाजपच्या मंत्र्यांच्या जागी तृणमूल काँग्रेस पिंवा शिवसेनेचा मंत्री असता तर एव्हाना राजकीय तांडव झाले असते. या सर्व प्रकरणांवर आवाज न उठवता महिला नेत्यांनी उर्फी जावेदवर बोलण्यास प्राधान्य दिले. पण शेवटी उर्फी जावेदच्या बाजूने प्रत्यक्ष उभ्या राहिल्या त्या अमृता फडणवीस. या सर्व प्रकरणात त्यांनी स्वतंत्र बाणा दाखवून उर्फीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला पाठिंबा दिला. अमृता फडणवीस म्हणतात, ‘‘उर्फी एक स्त्री आहे. ती जे काही करतेय ते ती स्वतःसाठीच करत आहे. त्यामध्ये मला काही वावगे वाटत नाही.’’ थोडक्यात, श्रीमती फडणवीस यांचे म्हणणे आहे, ‘‘कपडय़ांत काय आहे? ‘व्यावसायिक’ गरजेनुसार आता प्रत्येक क्षेत्रात पोशाख आणि पेहराव येत असतो.’’ पण संस्कृतीच्या नावाखाली कोणी काय खावे, कोणते कपडे घालावेत, कोणाशी लग्न करावे याबाबतचे निर्णय भाजपच्या सांस्कृतिक रक्षक संघटना घेऊ लागल्या आहेत. भाजपप्रणीत संघटना तथाकथित ‘लव्ह जिहाद’विरुद्ध ठिकठिकाणी मोर्चे काढतात. हिंदुत्वाच्या नावाखाली राजकीय वातावरण तापवतात. पण त्यांच्याच पक्षाचे मंत्री व पदाधिकारी पंझावालातील अंजलीस गाडीखाली चिरडून ठार मारतात त्यावर साधा ब्र काढीत नाहीत. हे आक्रित नाही का?

पोलीस कोणाचे?

कंझावालच्या रस्त्यावर अंजलीस एक कार मैलोन्मैल फरफटत नेतानाचे दृश्य देशाने पाहिले. दिल्लीचे पोलीस हे केंद्राचे आदेश पाळतात. राजधानीच्या शहरात निर्भयापासून अंजलीपर्यंतची अमानुष प्रकरणे घडतात. याचा अर्थ कायद्याची भीती नाही व सत्ताधारी पक्षात जाऊन सर्व पापे धुऊन घेता येतात, असा विश्वास एका विशिष्ट वर्गात निर्माण झाला. पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाशी महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा थेट संबंध होता. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण उचलून धरले. तेव्हा लोकांना वाटले पूजा चव्हाणला न्याय मिळेल, पण या मंत्री महोदयांनी पक्षांतर करताच हे अमानुष प्रकरणही भाजपच्या गंगेत धुऊन स्वच्छ झाले! पूजा चव्हाणला न्यायाची प्रतीक्षा कायम आहे व आता भाजपचे आंदोलन उर्फी जावेदच्या तोकडय़ा कपडय़ात अडकले!

अंजलीचा आक्रोश कंझावालच्या रस्त्यावर घुमतो आहे, पण मुंबईत उर्फीच्या तोकडय़ा कपडय़ांनी गदारोळ केला!

उर्फीच्या ढालीमागे अंजलीसारख्या अनेक निर्भयांचा आकांत आहे!

महाराष्ट्राच्या राजकारणाचेच ‘उर्फी’करण झाले. सर्वच घसरले. दोष कुणाला द्यावा?

 

@rautsanjay61

[email protected]