चोराला चोर म्हणणारच, संजय राऊत यांनी तडजोड फेटाळली

सहकारी साखर कारखाना घोटाळ्याच्या आरोपावरून मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात तडजोड करण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मालेगाव न्यायालयात स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हा खटला सुरू ठेवत न्यायालयाने 3 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, चोराला चोर म्हणणारच, असे संजय राऊत यांनी सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितले.

मालेगावच्या दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱयांकडून 178 कोटी 25 लाख रुपये जमा केले, त्याचा घोटाळा केला, असा आरोप करीत खासदार संजय राऊत यांनी या पैशांचा हिशोब मागितला. याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी ईडीकडे केली. दैनिक ‘सामना’त याबाबतचे वृत्त 22 जून 2023 रोजी प्रसिद्ध झाले. आपली बदनामी झाल्याचा दावा करीत मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव येथील न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला. न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंघ अं. संधू यांच्या समोर शनिवारी खासदार संजय राऊत हे हजर झाले.

शनिवारी, 9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत आहे. या खटल्यातील तुम्ही दोघेही लोकप्रतिनिधी आहात. लोकअदालतीमध्ये तडजोड करून एक नवा पायंडा पाडावा, असे मत न्यायालयाने मांडले. हे भ्रष्टाचाराचे प्रकरण लोकांसमोर आले आहे. खटला मी दाखल केलेला नाही. मला तडजोड करायची नाही. खटला चालू द्या, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी न्यायालयासमोर मांडली. मंत्री दादा भुसे यांच्या लौकीकास बाधा पोहचेल, त्यांची अब्रू जाईल याची माहिती असतानाही आपण दैनिक ‘सामना’त 22 जून 2023 रोजी वृत्त प्रसिद्ध केले, असा दोषारोप आपल्यावर आहे. हे दोषारोप, गुन्हा आपल्याला कबूल आहे का? असे न्यायालयाने विचारले असता हे दोषारोप व गुन्हा मान्य नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले. या खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी तीन फेब्रुवारी 2024 ही तारीख दिली. खासदार राऊत यांच्या वतीने अॅड. एम. वाय. काळे यांनी काम पाहिले.

जनतेचे प्रश्न विचारण्याचा मला अधिकार

न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हा खटला मिटवावा असं कोर्टाचं म्हणणं होतं. पण, माझं असं म्हणणं आहे की, भारतीय संविधानाने मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार दिलाय. गिरणा कारखाना बचावच्या नावाखाली जमा केलेल्या 178 कोटींचा हिशोब मी मागितला आहे. जनतेच्या वतीने प्रश्न विचारण्याचा, हिशोब मागण्याचा मला अधिकार आहे. ज्या शेतकऱयांनी पैसे दिले, ते शेतकरी पैसे परत मागण्यासाठी रस्त्यावर उतरले. महाराष्ट्रातल्या सगळ्याच वृत्तपत्रांत हा विषय आला. विधानसभेत हा विषय आला. पण, खटला आमच्यावर दाखल झाला. खटल्याला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. आपण केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, यावर ते म्हणाले की, 2024 नंतर ईडी, सीबीआय, महाराष्ट्राचे पोलीस या सर्वच यंत्रणा या सर्वच तक्रारींची दखल घेतील.

 

शिवसेनेची मशाल महाराष्ट्राला उजळून टाकेल

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपनेते अद्वय हिरे यांच्या मालेगावातील संपर्क कार्यालयाला भेट दिली. तेथे जमलेल्या हजारो नागरिकांशी संवाद साधला. अद्वय हिरे यांना राजकीय सूडापोटी तुरुंगात जावे लागले आहे. ते या मतदारसंघातील पुढचे आमदार राहतील. विधानसभेत जाण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला करायचे तेवढे अत्याचार करा, आम्ही सहन करायला तयार आहोत, त्याचेच नाव शिवसेना आहे. या अग्नी दिव्यातून आम्ही बाहेर पडू आणि पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल या महाराष्ट्राला उजळून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी राज्यातील सत्ताधाऱयांना दिला. हिरे कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. एका नोटिसीला घाबरून पाय लावून पळणारे, पक्षांतर करणारे आम्ही नाही. हिशोब मागितल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल करता, खटले दाखल करता, दादागिरी करता. हिसाब तो देनाही पडेगा, ही भाजपचीच गर्जना आहे. आम्ही सुद्धा दादांचे दादा आहोत. आमचा जन्मच दादागिरीतून झालाय. आम्ही फक्त नावाचे दादा नाहीत. आम्ही लढू, असा इशारा त्यांनी दादा भुसे यांना दिला. यावेळी उपनेते सुनील बागुल, उपनेत्या शुभांगी पाटील, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार अशोक धात्रक, संजय सावंत, जीवन कामत, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, आमदार नरेंद्र दराडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, प्रसाद खैरनार, अतुल सोनवणे, हिलाल माळी, भगवान करनकाळ, हेमंत साळुंखे, देवानंद बिरारी, महेश बडवे, राहुल दराडे, धिरज पाटील, संगीता नवलखा, निवृत्ती जाधव, पवन ठाकरे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक हजर होते