
केंद्र आणि राज्य सरकारने विरोधकांची बदनामी करण्यासाठी मोहीम उघडली आहे. राजकीय विरोधकांसंदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची असा हा बदनामी करण्याचा कारखाना आहे अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणी एसआयटी नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांची पिसे काढली.
राऊत यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले की, तुम्हाला एखाद्या विषयात एसआयटी स्थापन करायची तर करा, तुम्हाला हा तपास सीआयएकडे द्यायचा असेल किंवा केजीबीकडे द्यायचा असेल तरी द्या. ते पुढे म्हणाले की, “ज्या कोणाच्या चौकश्या करायच्या आहेत तेवढ्या करा. कोट्यवधी लोकं शिवसेनेमध्ये आहेत त्या प्रत्येकाची एसआयटी लावा. सगळे नेते ,उपनेते, खासदार, आमदार, शिवसैनिकच प्रत्येकासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करुन पोलिसांना आणि तपास यंत्रणांना त्याच कामाला लावा. येथे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची धूळदाण उडाली आहे, त्याविषयी मात्र बोलू नका.”
मुंबई महापालिकेच्या खात्याचे ऑडीट करणार असल्याचेही राज्य सरकारचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, नक्कीच करा. फक्त मुंबई महानगरपालिका नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे महानगरपालिका या सगळ्यांचे ऑडिट करा. त्याच्या आधी नगर विकास खात्याच्या गेल्या दीड वर्षातील सगळ्या कारभाराचं आणि व्यवहाराचेही ऑडिट करा आणि जर ऑडिटर्सना काही विषय कळत नसतील तर आम्ही त्यांना ती माहिती देऊ.























































