जमिनीवर कब्जा मिळावा म्हणून महायुतीत गँगवॉर सुरू आहे, संजय राऊत यांची घणाघाती टीका

राज्यातली महायुती शिंदे गँग, अजित पवार गँग आणि मोदी गँग यांची असून आता त्यांच्यात जमिनीवर कब्जा घेण्यासाठी गँगवॉर सुरू आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांसह 40 जणांना मोदीबिंदू झाल्याने महाराष्ट्रातलं सरकार पडलं, असे आसूडही त्यांनी मिंधे गटावर ओढले आहेत.

डोंबिवली येथे सभेत बोलताना संजय राऊत यांनी उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबारावरून मिंधे गटावर आणि सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, एक अंधार, भाजपचा म्हणजे तुमच्या सरकारमधला, त्याचं नाव गणपत. तो पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि शिंदे गँगच्या एका माणसावर गोळीबार करतो. ती गँग आहे, शिवसेना नाही. शिवसेना इथे आहे. पूर्वी आमच्या मुंबईत, डोंबिवलीत गँग होत्या. गोळ्या घालायचे. डोंबिवलीत अनेक गँगने एकमेकांना गोळ्या घातलेल्या आहेत. अनेकांच्या घरात गेले तरी भिंतीवर तुम्हाला फोटो लटकलेले दिसतील. मुंबईत अशा गँग होत्या, मग त्या गँगमधून अमुक तमुक फुटला, मग ते एकमेकांविरोधात लढत राहिले आणि मरत राहिले. तेही असेच मरणार आहेत. गणपत गायकवाड या आमदाराने महायुतीतल्या, म्हणजे शिंदे गँग, अजित पवार गँग आणि मोदी गँग या तीन गँगचं गँगवॉर कल्याणला पोलीस स्टेशनमध्ये झालं. गोळ्या घातल्या.. हे काही राष्ट्रासाठीचं क्रांतिकारक काम नाहीये. जसं भगतसिंगाने गोळ्या घातल्या, हुतात्मा कान्हेरेंनी गोळ्या घातल्या, चापेकर बंधुंनी गोळ्या घातल्या. आणि आमच्या शिवसैनिकांनीही महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी गोळ्या खाल्लेल्या आहेत. सीमाप्रश्नासाठी 69 हुतात्म्यांनी गोळ्या खाल्ल्या आहेत, संयुक्त महाराष्ट्रासाठी गोळ्या खाल्लेल्या आहेत. बेळगाव प्रश्नावर, राम मंदिरासाठी खाल्ल्या आहेत. पण, या महायुतीतल्या गँगमधल्या गोळ्या या जमिनीसाठी खाल्ल्यात. जमिनीवर कब्जा घेण्यासाठी महायुतीतच गँगवॉर सुरू आहे, जनतेच्या प्रश्नासाठी नाही. लोकांचं आरोग्य, शिक्षण, रोजगार, विकास यांच्यासाठी नाही, जमिनीसाठी.. गोळ्या पोलीस स्टेशनमध्ये घातल्या. मी असं ऐकलं की त्या शिंदे गँगच्या मेंबरला पाहायला स्वतः मुख्यमंत्री गेले. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्याचं मला कळलं. कुणी म्हटलं मोतीबिंदू आहे, मी म्हटलं नाही, हा मोदीबिंदू आहे. मोतीबिंदू चांगल्या माणसांना होतो. बिचारे काम करतात, अभ्यास करतात आणि मग त्याचं लहानसं ऑपरेशन होतं. हा मोदीबिंदू आहे आणि एकनाथ शिंदेंसह 40 जणांना मोदीबिंदू झाल्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार पडलं, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

‘गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या आणि त्यांनी गोळ्या झाडल्यावर सांगितलं, ते जरी एका गुन्हेगाराचं स्टेटमेंट असलं तरी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या महाराष्ट्रात जे गुंडांचं राज्य या मोदींनी, अमित शहांनी आणि फडणवीसांनी आणलं आहे, त्याचा पर्दाफाश या गोळीबाराने झालेला आहे, असा घणाघातही राऊत यांनी यावेळी केला.