
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे. भाजपचा चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा आहे. हे सरकार केवळ मुखवट्यावर चालले असल्याची टीका त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केली. यावेळी त्यांनी भाजपला ‘वॉशिंग मशीन’ची उपमा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख ‘वॉशिंग पावडर’ असा केला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये जाताच कसे स्वच्छ होतात, असा सवाल त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला.
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उदाहरणावरून भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भोपाळमधील सभेत अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र, त्या भाषणांनंतर अवघ्या आठ दिवसांत अजित पवार मंत्रिमंडळात सामील झाले. या घोटाळ्याच्या आरोपांचे पुढे काय झाले, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांनी द्यायला हवे, अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच, काँग्रेसच्या काळातील ज्या ‘आदर्श घोटाळ्या’चा उल्लेख भाजपने आपल्या श्वेतपत्रिकेत देशातील सर्वात मोठा संरक्षण घोटाळा म्हणून केला होता, त्याच अशोक चव्हाणांना भाजपने 72 तासांच्या आत पक्षात प्रवेश दिला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाजपच्या या कार्यपद्धतीवर टोला लगावताना संजय राऊत म्हणाले की, देशात आणि राज्यात अशी असंख्य उदाहरणे आहेत जिथे मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांना भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकायचे आणि वरून अमित शहा यांची ‘वॉशिंग पावडर’ टाकायची की सर्व काही स्वच्छ होऊन जाते, अशी जहरी टीका त्यांनी केली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावरील सर्व डाग धुवून निघाले असून, भाजप केवळ सत्तेसाठी भ्रष्टाचाराला पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.






























































