
शिवसेनेने कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. नाहीतर तुमची अवकात नव्हती. हम काच के घर में नही रहते, हे कुणाला सांगताय, असा सवाल करतानाच तुम्ही शिवसेनेमुळेच सुवर्ण महालात पोहाचलात, असा टोला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज भाजपला लगावला. तुम्ही महाराष्ट्राच्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे महाल जाग्यावर राहणार नाहीत. मोदी-शहांचे शंभर बाप आले तरी शिवसेना संपवता येणार नाही, असा घणाघातही त्यांनी भाजपवर केला.
अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांना झोपेतही विचारले तरी ते सांगतील की, शिवसेना कुणाची! मात्र हिंदुस्थानचा निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाला अजून शिवसेना कुणाची हे सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई जिंकण्यासाठी आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये घोटाळे करण्याचे प्रकार सत्ताधाऱयांकडून सुरू आहेत. मात्र शिवसेना संघर्ष करणार. हा संघर्ष करण्याची, मुंबईत राजकीय उलथापालथ करण्याची ताकद या शिवसैनिकांमध्ये आहे, असे संजय राऊत म्हणाले.
हे कसले यशस्वी गृहमंत्री
शहा यांच्या स्वागताचे भलेमोठे फलक लावले आहेत. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला लावले. मणिपूर जळतेय, कश्मीर पेटलंय… असे असताना हे कसले यशस्वी गृहमंत्री, असा सवाल संजय राऊत यांनी केला. मुंबई जिंकण्यासाठी याद्यांमध्ये घोटाळा केला जात आहे. मोदींच्या वाराणसी मतदारसंघात चाळीस चाळीस मुलं असलेले ब्रह्मचारी बाप सापडले. रामकमलदास याला 14 वर्षांत 42 पोरं झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत असे होऊ द्यायचे नाही. आपण या शंभर कौरवांना पुरून उरू, असे संजय राऊत म्हणाले.






























































