महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन; इथे गांजा, भांग पिकवणे शक्य नाही; खासदार संजय राऊत यांचा भाजपला सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे. इथे तुळशीचंच पीक येत राहील. ईडी, सीबीआय, एनसीबीचा वापर करून काही लोकांना इथे गांजा, भांग पिकवणे शक्य होणार नाही, असा सणसणीत टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला हाणला. कितीही खटपटी, लटपटी केल्या तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. डोमकावळ्यांनी कितीही फडफड केली तरी त्यांना हे सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही. एनसीबी, ईडीसारख्या केंद्रीय एजन्सीचा वापरही प्रभावी ठरत नसेल तर हे सरकार पाडण्यासाठी आर्मीच बोलवा, असा खोचक टोलाही त्यांनी लावला.

किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरुद्ध लढतात म्हणून त्यांना पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटीतील सातशे कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे दिली. त्यांनी त्यावर कारवाईसाठी प्रयत्न करावेत. घोटाळ्यातील कंपनी ही भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबाची आहे. सोमय्यांनी या भ्रष्टाचाराविरुद्धही लढा द्यायला काय हरकत आहे, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात जी कागदपत्रे दाखविली त्यावर काय उत्तर आहे ते सांगा, असे आवाहनही त्यांनी सोमय्यांना केले. जनता किंमत देत नसलेल्या तुमच्या बकबकी अन् पकपकीमुळेच तुमच्या पक्षाच्या राजकारणाचा एक दिवस अंत होईल, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. अजित पवार यांनी पुण्यात जी पत्रकार परिषद घेतली ती चिंतन करायला लावणारी आहे. महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र, कारखाने यांना मोडून काढण्याचा, बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे, त्याला अजित पवार यांनी चोख उत्तर दिलंय, तेवढं पुरेसं असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष

‘सामना’तील अग्रलेखावर आमदार आशीष शेलार यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष आहोत, मुळपुरुष आहोत. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवलेलं कसं चालेल? बाबरी पाडली तेव्हा ‘ती आम्ही पाडली नाही’ असे म्हणत आम्ही काखा वर करत पळालो नाही. कश्मीर खोऱयात हिंदूंचे जे हत्याकांड होत आहे, बांगलादेशमध्ये हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, घरे जाळली जात आहेत, त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात ‘सामना’तील अग्रलेखामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे.

हिंदूंचं रक्षण हे केंद्राचं कर्तव्य

कश्मीर खोऱयात आजपर्यंत 21 हिंदू आणि शिखांची, 19 पोलीस आणि जवानांची हत्या झाली आहे. देशातील आणि देशाबाहेरील हिंदूंचं रक्षण हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. हे सांगण्याला जर कोणी हे दारिद्रय़ म्हणत असेल तर त्यांच्याकडून दारिद्रय़ाची व्याख्या समजून घ्यावी लागेल. बांगलादेशातील हिंदू धोक्यात आहेत, हिंदुस्थानने या विषयावर बांगलादेशशी युद्ध करावं, असे भाजपाचे खासदार डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे, त्यावर आशीष शेलारांनी बोलावं, असेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.