
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलन केले. या आंदोलनाला यशही आले आणि सरकारने बहुतेक मागण्या मान्य केल्याने हजारो मुंबईत आलेले हजारो आंदोलक परत माघारी गेले आहेत. या आंदोलकांसोबतच्या चर्चेवेळी महायुती सरकारमधले फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने पुढे दिसले व इतर दोन उपमुख्यमंत्री मात्र या चर्चेत दिसले नसल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटाला सणसणीत टोला लगावला आहे. ”मागच्या वेळी ज्यांनी वाशीला गुलाल उधळत जल्लोष केला होता त्यांना यावेळी फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
”सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेत विरोधी पक्षातील नेत्यांना सहभागी करून घेतलं नाही. किंबहुना वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना देखील चर्चेत घेतलं नाही. फडणवीसांनी या वाटाघाटी फक्त भाजपच्या छत्रछायेखाली होतील व त्याचे श्रेय फक्त भाजपला मिळेल याची काळजी घेतली. जरांगे पाटील खुष होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असतील. शिवसेना या क्षणी आपलं मत मांडणार नाही. मराठा तरुणांना याचा फायदा होणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो”, असे संजय राऊत म्हणाले.
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने मंत्रीमंडळात जागा दिली नव्हती. ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ यांना मोदींनी विशेष लक्ष घालून मंत्रीमंडळात घेतले. ते मंत्रीमंडळात आहेत ही नरेंद्र मोदींची कृपा आहे. मोदी म्हणत अशतात की मी ओबीसींचा नेता आहे. खरंतर पंतप्रधानांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही. भुजबळ ओबीसी असल्याने मोदींनी सर्वांचा विरोध डावलून त्यांना मंत्रीमडंळात घेतलं. त्यामुळे आता भुजबळ जर नाराज असतील तर ते त्या संदर्भात मोदींची भेट घेतील व चर्चा करतील. संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमध्ये काही ना काही करत आहेत. सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगेंनी माघार घेऊ नये व फडणवीसांचं सरकार अडचणीत यावं”, असे संजय राऊत म्हणाले.