
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मिंधे गटावर टीका केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमाबद्दल विचारले. त्यावेळी संजय राऊत यांनी या कार्यक्रमावर टीका टिपण्णी करणं बरोबर नसल्याचे सांगितले. मात्र जे लोक स्वत:ला मोदींचे लोकं म्हणतात त्यांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो कार्यक्रम आयोजित केल्याचा टोला त्यांनी मिंधे गटाला लगावला आहे.
” तो एक राजकीय कार्यक्रम आहे. त्याबाबत न बोललेल बरं. जे स्वत:ला मोदींचे लोक म्हणतात त्यांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी तो कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचा तो कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याविषयी टिका टिपण्णी करणं बरोबर नाही” असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
भारत जोडो यात्रेवरून संजय राऊत यांच्यावर भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेलाही त्यांनी जोरदार उत्तर दिलं. ”हे जे असे टिकाकार असतात ते असे टपल्या व टिचक्या स्वत:शीच मारत बसतात. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. संपूर्ण देशात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा ही बिगर राजकीय यात्रा सुरू आहे. या यात्रेची त्यांना भीती वाटतेय. त्या यात्रेमागचा उद्देश समजून घ्या. या देशातील भीती व द्वेष भावना नष्ट करण हा त्यामागचा उद्देश आहे. काही लोकांकडे टीका करण्याचंच काम आहे. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. या देशासाठी ते 4500 किलोमीटर चालले आहेत तुम्ही 450 किलोमीटर चालून दाखवा” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करणार
”उद्या शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. देशभरात हा दिवस साजरा होता. तो एक प्रेरणा दिवस आहे. साहेब जरी नसले तरी त्या दिवसाचं महत्त्व आणि त्या दिवसाची शक्ती तशीच आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे षणमुखानंद हॉलमध्ये शिवसैनिकांशी व महाराष्ट्राशी संवाद साधतील. तसंच आम्ही सर्व जण त्यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथे असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करणार आहोत”, असे त्यांनी सांगितले.
































































