काही लोक प्रसाद खायला मंदिरात जातात, खासदार संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांना जिथे जायचे असेल त्यांनी जावे. पण काही लोक मंदिरात प्रसाद खायला जातात, असा टोला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. देवळात गेल्यावर प्रसाद मिळतो. त्यासाठीच काहीजण तिथे जातात. पण आम्ही रणांगणावर जातो, गेलोदेखील असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांनी आपण अयोध्या दौऱयावर जाणार असल्याचे आज जाहीर केले आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, अयोध्या सगळय़ांची आहे. रामलल्ला सगळय़ांचे आहेत. जर कुणाला रामलल्लांची आठवण झाली असेल तर त्यांनी नक्की अयोध्याला जावे. शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या अयोध्या दौऱयाची घोषणा केली आहे. मात्र त्याची तारीख जाहीर केलेली नाही. याबाबत बोलताना लवकरच अयोध्या दौऱयाची तारीख जाहीर करू. पण आमची यात्रा ही श्रद्धेची आहे, राजकीय यात्रा नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

गुजरात, उत्तर प्रदेशातील मशिदीवरील भोंगे बंद झालेत का ते आधी पहा

राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी सध्या काहीजण भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा, हे करा, ते करा असे सांगत आहेत. पण त्यांनी आधी गुजरातमध्ये मशिदीवरील भोंगे बंद झाले आहेत का, उत्तर प्रदेशात बंद झाले आहेत का हे आधी पहावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. ते वाई येथे पत्रकारांशी बोलत होते.

ज्याला जायचेय त्याने एवढा बोभाटा कशाला करायचा?

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाबाबत विचारले असता कोणी अयोध्या वारी करावी हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. ज्याला जायचेय त्याने एवढा बोभाटा कशाला करायचा, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच आम्ही काहीतरी वेगळे करत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठी माणसांना एकत्र केले. आम्ही तेव्हा विरोधात बसलो होतो. ते मराठी लोक आपल्यासोबत यावेत यासाठी कोणाला उत्साही आरती करावीशी वाटते, काही घोषणा कराव्या लागतात. आम्हीही काल आरती केली, परंतु त्यातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही निवडणुकीत योजना मांडू, विकासकामे केली आहेत त्यावर मते मागू, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.