उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी शिवसेनेची पाहणी, रामाचा वनवास संपवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी तेथील पाहणी करण्याकरता दाखल झालेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना ‘राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाचा विषय नसून तो आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. भाजपने लोकसभा निवडणूक 2019 आधी राम मंदिर निर्माणासाठी संसदेत अध्यादेश आणावा. नाही तर जनताच भाजपला वनवासात पाठवेल’, असा खणखणीत इशारा संजय राऊत यांनी दिला.

श्रीरामजन्मभूमी स्थानाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अयोध्येची पाहणी केली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये, सर्व ठिकठाक रहावे याची देखील पाहणी करण्यात आली.

sanjay-raut-up

या दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सध्या केंद्र, राज्य ते राष्ट्रपती भवनापर्यंत भाजपचं साम्राज्य आहे. मग न्यायालयाची भाषा बोलून मंदिर निर्माण मुद्द्यावर चाल ढकल का केली जात आहे’, असा सवाल त्यांनी केला. तसेच ‘भाजप नेहमी सत्य वचनाचा दावा करते, तर मग राममंदिराच्या मुद्द्यावर वोट बँकेचं राजकारण कायमचं बंद केलं पाहिजे’, असंही ते म्हणाले.

‘तीन तलाक आणि एससी/एसटीच्या मुद्द्यावर मोदी सरकारने अध्यादेश काढले आहेत तर आता श्रीराममंदिर निर्माणासाठी अध्यादेश का काढत नाही?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘मी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित यात्रेच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. राममंदिर निर्माणाच्या दिशेनं आपण आणखी एक पाऊल पुढे कसे जाऊ शकतो त्याच प्रयत्नात इथे आलो आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी भगवान श्री रामचंद्रांचं दर्शन करतील’, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, ‘अविरल गंगा’ मागणीसाठी हरिद्वार येथे उपोषण करणारे संत प्रोफेसर सदानंद यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

‘भाजप शासित राज्यात गंगा स्वच्छता आणि श्रीराममंदिर निर्माणाची मागणी झाल्यास पोलीस अटक करतात. तेही अशा राज्यात जिथे मुख्यमंत्री योगी आहेत. मात्र दुर्भाग्य असे आहे की योगीजी संतांच्या देखील मागण्या ऐकण्यास तयार नाही. हरिद्वारामध्ये पूज्य संतांचा अटकेनंतर 24 तासात मृत्यू होतो हे आश्चर्यचकीत करणार आहे’, असंही ते म्हणाले.