मॅचफिक्सिंगचा मास्टरमाइंड हिंदुस्थानच्या ताब्यात, दिल्ली पोलिसांना मोठे यश

658

क्रिकेटविश्वाला हादरवून सोडणाऱया 2000 सालामधील मॅचफिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांना गुरुवारी मोठे यश मिळाले. मॅचफिक्सिंगचा मास्टरमाइंड असलेल्या संजीव चावला याला लंडनमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिवंगत कर्णधार हॅन्सी क्रोनिएसोबत मॅचफिक्सिंगमध्ये मास्टरमाइंड असलेला संजीव चावला 20 वर्षांपासून फरार होता.

संजीव चावलाच्या प्रत्यार्पणासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने गेल्या महिन्यात अनेक वेळा लंडनच्या वाऱया केल्या होत्या. त्यानंतर चावलाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. गुन्हे शाखेचे डीसीपी जी. रामगोपाल नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्कॉटलंड यार्डकडून चावलाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला दिल्लीत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॉटलंड यार्डकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाज चावला याला बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हिंदुस्थानी पोलिसांच्या ताब्यात दिले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हीथ्रो विमानतळावर त्याचा ताबा दिल्ली पोलिसांनी घेतला.

अनेक देशांतील क्रिकेटपटूंशी होता चावलाचा संपर्क
संजीव चावला व दिवंगत हॅन्सी क्रोनिए यांच्याविरुद्ध दिल्ली क्राइम ब्रँचने 70 पानी आरोपपत्र दाखल केलेले होते. दोघांवर हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिकादरम्यान 16 फेब्रुवारी 2000 मध्ये झालेल्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याचा आरोप होता. त्यामुळे स्कॉटलंड यार्डने चावलाला 2001 साली अटकही केली होती. दिल्ली पोलिसांना त्यांच्याकडीलही कागदपत्रे मिळाली असल्याने चावलाची चौकशी करणे आणखी सोपे होणार आहे. हिंदुस्थानसह पाकिस्तान, वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिका आदी देशांतील क्रिकेटपटूही चावलाच्या संपर्कात होते. याचबरोबर अंडरवर्ल्डशीदेखील त्याचे संबंध असल्याची माहिती आहे. संजीव चावलाला 12 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या