खाद्यभ्रमंती – पुडला, खमणी सिंधी सँडविच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>संजीव साबडे

मुंबईतील ही अशी खाऊ गल्ली जिथे मोठा व्यापार चालतो. हजारो व्यापारी आणि लाखभर कामगार तिथं रोज कामासाठी येतात, पण अनेक मुंबईकर केवळ खादाडीसाठी तिथं जातात. ती आहे झवेरी बाजारची प्रख्यात खाऊ गल्ली. तिथं अन्य खाऊ गल्ल्यांत मिळणारे बहुतेक सर्व प्रकार हमखास मिळतात, पण काही खाद्य पदार्थ ही इथली खासीयत आहे. कारण ते सर्वत्र मिळत नाहीत.

खाणाऱयांसाठी मुंबई हा स्वर्गच आहे. इथे पहाटेपासून मध्यरात्र उलटून गेली तरी कुठे ना कुठे नक्की खायला मिळतं. या शहरात एकटे राहणारे लोक, बाहेरगावाहून रेल्वे, विमान वा बसने येणारे लोक यांची काळजी मुंबईतील खाऊ गल्ल्या आणि फुटपाथवरचे फेरीवाले घेतात. त्यांना उपाशी राहावं लागत नाही. शिवाय गंमत म्हणून खाणारे खादाड, विविध ठिकाणच्या खाद्य पदार्थांची चव घेण्यासाठी फिरणारे भटके व चोखंदळ यांच्यासाठी या गॅल्ल्या व फुटपाथ हे पर्वणीच आहेत.

एक अशी खाऊ गल्ली आहे, जिथे मोठा व्यापार चालतो. हजारो व्यापारी आणि लाखभर कामगार तिथं रोज कामासाठी येतात, पण अनेक मुंबईकर केवळ खादाडीसाठी तिथं जातात. ती आहे झवेरी बाजारची प्रख्यात खाऊ गल्ली. तिथं अन्य खाऊ गल्ल्यांत मिळणारे बहुतेक सर्व प्रकार हमखास मिळतात, पण काही खाद्य पदार्थ ही इथली खासीयत आहे. कारण ते सर्वत्र मिळत नाहीत. शेव खमणी, खमण ढोकळा, सिंधी दाल सँडविच, पुडलो, भरभरून तट्ट झालेली दाबेली, भेळीचे असंख्य प्रकार, सामोसा भेळ, कचोरी भेळ, फराळी कचोरी, तळलेला, भाजलेला मसाला व साधा खिचा पापड असे असंख्य प्रकार चिंचोळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसत राहतात. शिवाय वेगवेगळे अनेक प्रकारचे सँडविच, छोले भटुरे, छोले व कुलचे, नानाविध डोसे, मेदुवडा, मसाला इडली, भाजीपाव, वडापाव, झुणका भाकरी, दहीवडा, दही कचोरी, जिलबी, रबडी, लस्सी, ज्यूस, मिल्कशेक, रंगीबेरंगी थंड पेये, थंडाई, फ्रूट चाट… एखाद्या मोठय़ा रेस्टॉरंटच्या मेन्यूपेक्षा इथं खूप पदार्थांची रेलचेल असते. तेही रेस्टॉरंटपेक्षा स्वस्त.

मरीन लाइन्सला उतरून काळबादेवीच्या दिशेला जाताना प्रिन्सेस स्ट्रीटवरही खाद्य पदार्थांचे अनेक स्टॉल्स लागतात. स्टेशनपासून जवळच पारसी डेरी फार्म आहे. दूध, दही, लस्सी, पनीर, पेढे, दुधाच्या अन्य मिठाया तिथं मिळतात. अत्यंत चविष्ट आणि लक्षात राहील अशी चव, पण सर्व प्रकार सामान्यांना फारसे न परवडणारे. या डेअरीला 100/125 वर्षे होऊन गेली. भरपूर पैसे असतील तरच तिथे जायचं. प्रिन्सेस स्ट्रीटवरून सरळ पुढे जात राहिलात की, एक रस्ता बोरीबंदरच्या, तर त्याच्या विरुद्धचा रस्ता काळबादेवीमार्गे झवेरी बाजारला जातो. बोरीबंदरच्या दिशेला वळताच गरम सामोसे, कचोरी, भेळ, रगडा पॅटिस, लस्सी व थंडाई अशी लहान लहान दुकाने व त्यासमोर कायमची गर्दी दिसते. दुपारी व संध्याकाळी काळबादेवीच्या दिशेला गेलात की, उजव्या बाजूला पहिल्या मजल्यावर आहे जोशी क्लब. गुजराती पद्धतीचं अनलिमिटेड जेवण.  अतिशय गरमागरम. वाढपी सतत वाढत राहतो आणि आपल्याला नाही म्हणवत नाही. ‘पोट फुटेस्तो’वर यालाच म्हणत असावेत. खाणावळ टाईपचा हा क्लब. काहीसा महागडा, पण कधीतरी नक्की जावा असा. तसंच पुढे जाताना डावीकडे काळबादेवीचं अगदी लहान मंदिर. त्याच्या समोरच्या एका लहानशा दुकानात संध्याकाळी

नॉनस्टॉप सामोसे बनवणं सुरू असतं. त्यावेळी तिथे बसायला सोडा, पण अनेकदा उभं राहायलाही जागा नसते. त्याच्या अलीकडे एका गल्लीत (बहुधा बाबू गेनू स्ट्रीट) एक राजस्थान्याचं छोटं रेस्टॉरंट. तिथं सामोसा, वडा, साबुदाणा वडा, फराळी कचोरी, फाफडा, जिलेबी असे अनेक प्रकार गरम व ताजे मिळतात. दवा बाजार व अन्य छोटे व्यापारी, त्यांचे कर्मचारी तिथे खाताना दिसतात. किफायतशीर दर, पण स्वच्छतेची फार अपेक्षा ठेवू नये.

मुख्य रस्त्यावरून पुढे झवेरी बाजारच्या दिशेने जाताना भगत ताराचंद रेस्टॉरंट. एक नव्हे, चार रेस्टॉरंट. खरं तर त्या खाणावळीच. उत्तर हिंदुस्थानी, काहीसं राजस्थानी, थोडंसं कच्छी असं बऱयापैकी मसालेदार, तिखट, पण उत्तम जेवण तिथे मिळतं. बहुधा भांडाभांडी होऊन भगत ताराचंद चार झालेत. त्यामुळे हे एक भगत ताराचंद नावाआधी ‘जी’, दोन ‘के’ व एक ‘आर’ लावतात. जेवण अतिशय उत्तम. उन्हाळ्यात तिथं गेल्यावर कच्छी बीअर म्हणजे थंड ताकाची बाटलीच टेबलावर आणून ठेवतात. अनेक जण जेवून बाहेर पडताना एखादी थंड ताकाची बाटली हमखास नेतात. चारही ठिकाणी चव साधारण सारखीच.

पुढे मुंबादेवी मंदिर आणि झवेरी बाजार व तेथील खाऊ गल्ली. तिथे पुडलो व ब्रेड पुडलो चांगला मिळतो. पुडलो म्हणजे बेसनचा डोसा.  मूगडाळीच्या पिठाचाही तो बनवतात. उत्तर हिंदुस्थानात त्याला चिल्ला म्हणतात.  प्लेन वा कांदा टोमॅटो असलेला. म्हणजे टोमॅटो ऑम्लेट. ब्रेड व टोमॅटो ऑम्लेटच, पण त्यावर चीज असतं, पनीरचे तुकडे, वरून शेव, कांदा, दोन चटण्या. खमणी खाणारेही खूप लोक दिसतात. खमणी म्हणजे चुरलेलं खमण म्हणता येईल. मात्र वेगळी बनवली जाते. गरमागरम खमणीवर शेव, कांदा, टोमॅटो, काही ठिकाणी चाट मसाला घालतात. वर एखाददुसरी तळलेली लांबडी हिरवी मिरची. मसाला इडली हा प्रकार या ठिकाणी मिळतो हल्ली. पण इथे आधी कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बटर, चीज असा मसाला तयार करून त्यात यलो बटरमध्ये परतलेली इडली देतात. सोबत एक साधी व एक काहीशी आंबट चटणी. काही ठिकाणी गरम फाफडा, जिलबी असते तर काही स्टॉलवर सिंधी दाल सँडविच. ब्रेडला चटणी लावून त्यात समोसा वा वडा कुस्करून घालायचा. शिवाय टोमॅटो, कांदा, बीट वगैरे घालून वरून सिंधी पद्धतीची गरमागरम पातळ डाळ. वाटल्यास त्यावर आंबटगोड व तिखट चटणी. आता तर त्यावर चीजही घालतात. काही ठिकाणी सामोसा, वडाऐवजी बटाटाच कुस्करून घालतात. हा गमतीदार प्रकार उल्हासनगर व चेंबूरची खाऊ गल्ली इथे नक्की मिळेल. सिंधी व्यापाऱयांबरोबर आता गुजराती व मराठी लोकांनाही या सँडविचची सवय लागली आहे. शिवाय पिझ्झा, ब्रेड पिझ्झा, फ्रँकी, मोमोज, भेळपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटिस, दहीवडा यांचे ठेले रस्त्यांवर लागलेले असतात. इथली खच्च दाबून भरलेली एक दाबेली खाल्ली तरी अनेकांचं पोट भरतं. कारण पावही मोठा असतो. काही ठेलेवाले वरून शेवेबरोबर कांदा, कोथिंबीर चीजही भरपूर घालतात व सोबत चटणी देतात. छोटे सामोसे, छोटे बटाटेवडे, तुपात तळलेली फराळी कचोरी व साबुदाणा वडा अन्यत्र नव्हे, पण या गल्लीत हमखास मिळतो. त्यासोबत दही, कोथिंबीर, मिरची, साखर घातलेली चटणी. कचोरी व साबुदाणा वडय़ाचा घाणा कढईतून काढला की, तो लगेच संपून जातो.

या खाऊ गल्लीत चायनीज फूडही मिळतं, पण नॉनव्हेज अजिबात नाही. तिथे नॉनव्हेज फूडचं रेस्टॉरंट शोधावं लागतं. झवेरी बाजारात मुद्दाम जाणं होत नाही, पण काही खरेदीच्या निमित्ताने गेलात तर खाऊ गल्लीत खाल्ल्याशिवाय सुटकाच होणार नाही तुमची. एरवीही त्याच्या आसपास असाल वा काळबादेवी, मुंबादेवीच्या दर्शनाला गेलात तर या खाऊ गल्लीला नक्की भेट द्या. रेस्टॉरंटपेक्षा बरेच स्वस्त व उत्तम प्रकार तिथे मिळतील.

[email protected]