
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसेल अशी शक्यता आहे. कारण, अजित पवार यांचे एक विश्वासू सहकारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हे निकटवर्तीय दुसरे तिसरे कुणीही नसून संजोग वाघेरे आहेत. संजोग वाघेरे माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष होते. संजोग वाघेरे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाविषयी त्यांच्यात चर्चा झाली. संजोग वाघेरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
याच मावळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण होणार असून तिढा वाढला आहे. मिंधे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या जागेवर भाजपच्या बाळा भेगडेंनी दावा ठोकला आहे. त्यांच्या वाढदिवसासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरही त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. तसंच, काही दिवसांपूर्वी भेगडे यांनीच याबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होती. त्याचवेळी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनीही ही जागा आपल्या गटाकडे असेल, असा दावा केला होता. त्यामुळे या जागेचा पेच आणखी वाढेल, असं चित्र आहे.





























































