स्वप्न सत्यात अवतरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही मालिका एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात टार्निंग पॉइंट घेऊन येतात आणि त्यामुळे आयुष्याला वेगळी दिशा मिळते. असेच घडले ते सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं सपान’ या मालिकेतील वीरेंद्र ही भूमिका संकेत पाटील चिकटगावकर हा अभिनेता करत आहे… एक प्रॉमिसिंग चेहरा.

संकेत हा छत्रपती संभाजीनगरचा आहे. त्याचे शालेय शिक्षण हे सैनिकी शाळेत झाले. कॉलेज शिक्षण घेत असताना पथनाटय़, नृत्य अशा कलांची आवड संकेतच्या मनात निर्माण झाली. संकेत म्हणतो, ‘‘या क्षेत्रात करीअर करायचे तर त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, या हेतूने मी मराठवाडा विद्यापीठात नाटय़शास्त्रासाठी प्रवेश घेतला. तिथून एक वेगळी दिशा मिळाली. मग एकांकिका महोत्सव, नाटय़ महोत्सवात सहभागी झालो.’’

दरम्यानच्या काळात ‘स्वराज’ या मालिकेसाठी संकेतने सहाय्यक दिग्दर्शनदेखील केले होते. तसेच ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’, ‘स्वाभिमान’, ‘जय जय स्वामी समर्थ’ अशा मालिकांतदेखील त्याने भूमिका केल्या होत्या.

नाटय़ महोत्सवात एकदा ‘गार्बो’ हे नाटक सादर करण्यात आले होते. ते नाटक पाहायला सचिन गोस्वामी आले होते. संकेतचे काम त्यांना आवडले. त्यांनी संकेतला ऑडिशन देण्यासाठी सांगितले आणि मग ‘तुझं माझं सपान’मधील वीरेंद्र या व्यक्तिरेखेसाठी त्याची निवड झाली. संकेत म्हणतो, ‘‘या मालिकेसाठी निवड झाल्यानंतर आमचे वर्कशॉप घेण्यात आले. वीरेंद्रच्या घराण्यात खरे तर कुस्तीची पार्श्वभूमी आहे, पण काही कारणास्तव त्याने कुस्ती खेळायची नाही असे त्याला सांगितले गेले आहे. त्याचा विवाहदेखील एका कुस्तीपटू मुलीशी होतो आणि मग त्या कुटुंबात काय वळणे येतात, वीरेंद्र पुन्हा कुस्तीकडे वळतो का? असा उत्तम आलेख या भूमिकेला आहे. मुळात प्राजक्ता ही या मालिकेतील अभिनेत्री स्वतः कुस्तीपटू असल्याने तिचेसुद्धा या खेळासंबंधी खूप मोलाचे मार्गदर्शन लाभते.’’ टीव्ही या माध्यमाविषयी संकेत म्हणतो, ‘‘रंगभूमी, मालिका ही दोन्ही माध्यमे मला आवडतात. पण टीव्हीमुळ चेहऱयाला पटकन ओळख मिळते. ही गोष्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.’’
गणेश आचवल