
संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्य़ा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 53व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त अमरावती-नागपूर महामार्गावर असलेल्या गुरुकुंज मोझरी येथील महासमाधीवर पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार पहाटे साडे चार वाजता ब्रम्हमुहूर्तावर तीर्थ स्थापनेने व सामुदायिक ध्यानाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.
सात दिवसीय या पुण्यतिथी महोत्सवासाठी राष्ट्रसंतांची समाधी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली आहे. तसेच महाद्वार व प्रार्थना मंदिरावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, 25 ऑक्टोबर रोजी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान गुरुदेव भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन गुरूदेव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
आजपासून सुरू झालेला या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, ग्रामगीता प्रवचन आदी कार्यक्रम पार पडणार आहे. या पुण्यतिथी महोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा असलेला श्रद्धांजली कार्यक्रम 25 तारखेला दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी पार पडणार असून यावेळी तुकडोजी महाराजांना मौन श्रध्दांजली वाहिली जाणार आहे.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी देश-विदेशातील लाखो गुरुदेव भक्तांची उपस्थिती असते. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या अटीं व नियमांनुसार मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थित पुण्यतिथी महोत्सव पार पडणार आहे. त्यामुळे गुरुदेव भक्तांनी समाधी स्थळावर गर्दी करू नये, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच दैनंदिन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या ‘श्री गुरुदेव टीव्ही’ या यूट्यूब चॅनलवर केले जाणार आहे. दरम्यान, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गुरुभक्तांनी पुण्यतिथी सोहळ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही सेवा मंडळाने केले आहे.

























































