
सामना ऑनलाईन, मुंबई
सांताक्रुझ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांकडून चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त केल्या आहेत. त्यांनी गोरेगाव, जुहू, विलेपार्ले परिसरातून मोटरसायकली चोरल्या होत्या. सांताक्रुझ पश्चिम परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या व्यक्ती त्यांच्या महागडय़ा गाडय़ांच्या चाव्या सुरक्षा रक्षकाकडे देतात. मार्च महिन्यात त्या सोसायटीमधून एक महागडी गाडी चोरीला गेली होती. त्याबाबत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या महिन्यात वाकोला येथे माजी सैनिकाचा वाहन अपघातात मृत्यू झाला होता. ते अपघातगस्त वाहन चोरीचे असल्याचे तपासात उघड झाले होते. वाहनचोरीच्या गुह्याचा तपास सांताक्रुझ पोलीस करत होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, परिमंडळ-9 चे पोलीस उपायुक्त परमजित दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विनायक जाधव, पोलीस हवालदार प्रभाकर भोसले, संजय राठोड, प्रवीण घाटगे, दीपक बागल, ओम प्रशांत जगताप, प्रकाश बावडेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला व दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पहाटेच्या वेळास ते दोघे चोरीच्या मोटरसायकली टो करून न्यायचे.
इमारतीची केली होती रेकी
त्या सोसायटीत गाडय़ांच्या चाव्या या सुरक्षा रक्षकाकडे असल्याचे एका मुलाने पहिले होते. त्यानंतर त्या दोघांनी रेकी केली होती. रेकी केल्यावर पहाटेच्या सुमारास त्या दोघांनी पाच महागडय़ा गाडय़ांच्या चाव्या चोरल्या. त्या दोघांनी एक महागडी गाडी चोरली.





























































