संतोष बांगर यांना पाहून लग्नमंडपात ‘50 खोके, एकदम ओके’च्या घोषणा

शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेल्यांना जनतेने माफ केलेले नाही. शिंदे गटाच्या आमदारांना ते जातील तिथे ‘पन्नास खोके, एकदम ओके’ च्या घोषणांना सामोरे जावे लागत आहे. असाच अनुभव हिंगोली जिह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना आला. एका लग्न समारंभात सहभागी झालेल्या आमदार संतोष बांगर यांना पाहून कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे त्यांचा चेहरा चांगलाच पाहण्यालायक झाला.

पाथरी तालुक्यातल्या देवेगाव येथे सोमवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्नाला खासदार बंडू जाधव, आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. यावेळी अचानक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी आधी, ‘ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, ‘उद्धव ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ची घोषणाबाजी केली. तेव्हा संतोष बांगर यांची चांगलीच गोची झाली. त्यांचा अक्षरशः चेहरा ओशाळला. मंडप परिसरात सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे त्यांनी तिथून लवकर काढता पाय घेतला. या घोषणाबाजीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.