
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गड येथील देवी भगवती मंदिरातील मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला म्हणजे 26 सप्टेंबर रोजी हे मंदिर उघडणार आहे. देवी मातेच्या स्वयंभू मूर्तीचे भाविकांना दर्शन होणार आहे.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषदेत विश्वस्त ऍड. ललित निकम, भूषणराज तळेकर यांनी ही माहिती दिली. भगवती देवीच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुरातत्व विभागामार्फत 21 जुलैपासून सुरू करण्यात आले. तेव्हापासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मूर्तीवरील शेंदूर लेपनाचा भाग धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला असून, देवीची अतिप्राचीन रूपातील स्वयंभू मूर्ती समोर आली आहे. काशी येथील पंडित गणेश्वरशास्त्री द्रविड, नाशिकचे पंडित शांतारामशास्त्री भानोसे आणि गडावरील पुरोहित संघाच्या मार्गदर्शनाने उद्या मंगळवारपासून 8 सप्टेंबर या कालावधीत ट्रस्टतर्फे धार्मिक विधी करण्यात येतील. संपूर्ण पितृपक्षात देवी अथर्वशीर्ष पाठाचे अनुष्ठान होईल. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला म्हणजे 26 सप्टेंबरपासून मंदिर खुले होईल, याप्रकारचे नियोजन ट्रस्टने केले आहे.
























































