
सामना प्रतिनिधी, पुणे/हडपसर
देवाची उरुळी परिसरातील राजयोग होलसेल साडी गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत होरपळून आणि धुराने गुदमरून पाचजणांचा मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुकानाला आग लागली. दुकान बाहेरून बंद असल्याने कामगारांना बाहेर पडता आले नाही. यामुळे आतमध्ये कामगारांचा मृत्यू झाला.
राकेश रियाड (22), धर्मराम वाडियासार (25), राकेश मेघवाल (25), सूरज शर्मा (25) आणि धीरज चांडक (23) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुकानचालक सुशील बजाज, भवरलाल प्रजापती व सुरेश जाखड या तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर यातील सुशील बजाज व सुरेश जाखड यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे हवालदार हेमंत कामथे यांनी फिर्याद दिली आहे.
राकेश, धर्मराम, मेघवाल आणि सूरज हे मूळचे राजस्थानमधील रहिवासी होते तर चांडक हा लातूरचा रहिवासी होता. राहण्याची सोय नसल्यामुळे हे सर्वजण दुकानातच राहत होते. चोरी होऊ नये या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप लावले जाते. गुरुवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास दुकानाला आतमधून आग लागल्याचे एका कामगाराच्या लक्षात आले. त्याने तत्काळ मॅनेजरला फोन केला. यावेळी आतमध्ये पाच कामगार झोपले होते. काही वेळात आगीने तीव्र रूप धारण केले तर दुकान बंद असल्याने कामगारांना बाहेर पडणे शक्य झाले नाही.





























































