Ranji Trophy आकडेवारी बोलतेय, मुंबईचा खेळाडू देतोय डॉन ब्रॅडमन यांना टक्कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजी करंडकाचा अंतिम सामना मुंबई आणि मध्यप्रदेशमध्ये सुरू आहे. मुंबईने पहिल्या डावामध्ये 374 धावांपर्यंत मजल मारली. मधली फळी कोसळल्यानंतर सर्फराज खान याने एक बाजू लावून धरत शतकी खेळी केली. रणजी करंडकातील हे त्याचे चौथे शतक ठरले. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईला पहिल्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारता ाली.

24 वर्षीय सर्फराज खान याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा 25 वा सामना आहे. आपल्या या छोट्याशा कारकिर्दीमध्ये त्याने 82.83 च्या सरासरीने 2 हजार 485 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 8 शतकांचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजारांहून अधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्फराज खान हा डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू ठरला आहे.

डॉन ब्रॅडमन यांनी 234 लढती 95.14 च्या सरासरीने 28 हजार 67 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यांनी 117 शतक आणि 69 अर्धशतक ठोकले. या यादीमध्ये हिंदुस्थानचे महान फलंदाज विजय मर्चंट हे तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी प्रथम श्रेणीच्या 150 लढतीत 71.64 च्या सरासरीने 13 हजार 470 धावा केल्या आहेत. यात त्यांच्या 45 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील बॅटिंग सरासरी

डॉन ब्रॅडमन – 234 लढतीत 28 हजार 67 धावा, 95.14 ची सरासरी
सर्फराज खान – 25 लढतीत 2 हजार 485 धावा, 82.83 ची सरासरी
विजय मर्चंट – 150 लढतीत 13 हजार 470 धावा, 71.64 ची सरासरी
जॉर्ज हेडली – 103 लढतीत 9 हजार 921 धावा, 69.56 ची सरासरी

900 हून अधिक धावा

सर्फराज खान हा यंदाच्या रणजी करंडकामध्ये खोऱ्याने धावा काढत आहे. रणजी ट्रॉफी 2021-22 मध्ये त्याने आतापर्यंत 8 डावांमध्ये फलंदाजी करताना 937 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. 133.85 च्या सरासरीने आणि 4 शतक व 2 अर्धशतकांच्या मदतीने त्याने त्याने या धावा केल्या आहेत.