
आपल्या नृत्यकौशल्याने बॉलीवूडमधील मोठमोठय़ा कलाकारांना आपल्या तालावर नाचविणाऱ्या ज्येष्ठ नृत्यांगना सरोज खान यांना श्वसनाच्या त्रासामुळे शनिवारपासून वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सरोज खान यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकाने दिली आहे.
श्वसनाच्या त्रासामुळे 71 वर्षीय सरोज खान यांना शनिवारी रात्रीपासून वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरोज खान यांच्या एका जवळच्या नातेवाईकाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. ‘आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. श्वास घेण्यात काही अडचणी येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सरोज खान यांना होणारा त्रास पाहता त्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली. पण, ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे’, असे नातेवाईकाने सांगितले आहे. शिवाय लवकरच त्यांना रुग्णालयातून घरीसुद्धा पाठवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.



























































