
सामना प्रतिनिधी । पुणे
‘मृताच्या टाळूचे लोणी खाणे’ अशी वाक्प्रचार आपल्याकडे रूढ आहे. असाच प्रकार ससून रूग्णालयात घडला असून मृताचा दाखला देण्यासाठी 500 रूपये घेणाऱ्या महापालिकेतील शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महेश आनंद जातेगावकर (वय 43, रा. राधिका हौसिंग सोसायटी, विठ्ठलवाडी जकातनाक्याजवळ, सिंहगड रस्ता) याला अटक केली आहे. 25 वर्षीय तरूणाने यासंदर्भात तक्रार दिली होती.
तक्रारदार यांच्या वडिलांचे ससून रूग्णालयात निधन झाले आहे. त्याचा मृत्यूचा दाखला घेण्यासाठी तक्रारदार यांनी जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज केला होता. मृत्यूचा दाखला घेण्यासाठी तक्रारदार ससून रूग्णालयात गेले असता जातेगावकर याने तक्रारदार यांना 800 रूपये दिले तर लगेच हा दाखला मिळेल असे सांगितले. तडजोडी अंती 500 रूपये देण्याचे ठरले. जातेगावकर याच्या पैशाच्या तगाद्याला वैतागुन या तरूणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची खातरजमा केली असता, जातेगावकर हा 500 रूपये मागत असल्याचे पडताळनीनंतर स्पष्ट झाले. त्यानुसार सापळा रचून जातेगावकरला रंगहात पकडण्यात आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.






























































