‘कोयना’तून दहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयना धरण क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून दमदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणात पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी दहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलण्यात आले असून, त्यामधून प्रतिसेकंद 8 हजार क्युसेक, तर धरण पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक असा एकूण 10 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपेक्षा शुक्रवारी कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पाणी सामावून घेण्याची क्षमता, आगामी काळातील पाऊस, सध्याची पाणी आवक व पूर्वेकडे कोयना व कृष्णा नदीपात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता, संभाव्य महापुराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी सकाळी दहा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी वर उचलून त्यातून 8 हजार व धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून 2100 असे प्रतिसेकंद 10 हजार 100 क्युसेक (दोन लाख 85 हजार 931 लिटर) पाणी सोडण्यात आले आहे. पूर्वेकडील विभागात पडणाऱया पावसामुळे कोयना नदी पाणीपातळीत आधीच वाढ झाली होती. आता धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदी पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणात यापुढे पडणारा पाऊस व पाण्याची आवक वाढली तरच यापेक्षा जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पाच ते शुक्रवारी सायंकाळी पाच या चोवीस तासांत कोयनानगरला 162, नवजाला 126 व महाबळेश्वरला 288 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा चोवीस तासांत 3.76 टीएमसीने वाढला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 88.97 टीएमसी झाला असून, धरण 84.55 टक्के भरले आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 16.28 टीएमसी पाण्याची गरज आहे.