साताऱ्य़ात खासगी बसच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, एक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पुण्याकडे निघालेल्या खासगी बसची चाके निखळून त्याखाली सापडल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात मनोजकुमार बहाद्दूर भार्गव (वय 24, सध्या रा. उंब्रज, ता. कराड, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. बसचालक गौतम गणपत सूर्यवंशी (रा. माठेवाडा, ता. सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

उंब्रज परिसरात मनोजकुमार भार्गव हा त्याच्या मित्रांसमवेत राहण्यास होता. भार्गव आणि त्याचे मित्र परिसरातील गावांत प्लॅस्टिक वस्तूविक्रीचा व्यवसाय करीत असत. सकाळी भार्गव आणि त्याचे मित्र प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊन ट्रकने बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आले. ट्रकमधून साहित्य उतरविल्यानंतर ते महामार्गावरच दुसऱ्य़ा वाहनाची वाट पाहत थांबले होते. याचदरम्यान कोल्हापूरकडून पुणे बाजूकडे एक खासगी बस प्रवासी घेऊन निघाली होती. वेगात असणाऱ्य़ा बसची पाठीमागील दोन्ही चाके अचानक निखळली. निखळलेली चाके महामार्गावरून तशीच धावत पुढे आली व त्याचा जोराचा धक्का मनोजकुमार भार्गव आणि मुनसीफ खान (सध्या रा. उंब्रज, मूळ रा. उत्तर प्रदेश) या दोघांना बसला. वेगात असणाऱ्य़ा चाकाचा दणका छातीत बसल्याने भार्गव हा गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून, बसचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले करीत आहेत.