सातारा जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन, विकेण्डला संपूर्ण संचारबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शिथिल केलेला लॉकडाऊन पुन्हा कडक करण्यात आला आहे. यानुसार अत्यावश्यक बाबींची दुकाने, आस्थापने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, तर औषध दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. त्याच वेळी रुग्णालयांमधील औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, अत्यावश्यक नसलेली दुकाने पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 3 जुलैपासून पुढील आदेश होईपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत, तसेच आठवडय़ाच्या शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वैध कारणाशिवाय कोणासही संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. तथापि, वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कोर्सेस सुरू ठेवण्यास परवानगी असेल. जिल्ह्यातील सेतू केंद्र, आधार केंद्र, चार्टर्ड अकाऊंटंट कार्यालये या आस्थापनांना सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत शैक्षणिक साहित्य घरपोच पुरविण्यासाठी परवानगी राहील. मॉल्स, सिनेमागृहे, नाटय़गृहे आदी पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ही केवळ घरपोच पार्सल सेवेसाठी सकाळी 9 ते रात्री 8पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही. लॉजिंग सुविधा पूर्णपणे बंद राहील.

जिल्हाधिकाऱयांनी फेरविचार करावा!

महाबळेश्वर – जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱयांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतर महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर खाली येत नसल्याने जिल्हाधिकाऱयांनी पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.