
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंप चोरणारी सातजणांची टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्व संशयित कराड तालुक्यातील आहेत. त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार रुपये किमतीच्या सुमारे 43 मोटारी जप्त केल्या आहेत.
अभय जनार्दन चव्हाण, आप्पा रघुनाथ सातपुते, गणेश बाळासा कांबळे, गणेश महेंद्र चव्हाण (सर्व रा. पेरले, ता. कराड), शुभम कालिदास जेटीथोर, साहिल कालिदास जेटीथोर, कपिल सत्यवान जेटीथोर (सर्व रा. कालगाव, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सातारा जिल्ह्या त गेल्या काही महिन्यांपासून विहिरीवरील विद्युत मोटारी चोरणारी टोळी सक्रीय झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही या चोरीचा छडा लागत नव्हता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस याचा तपास करीत असताना त्यांना विद्युत पंप चोरणाऱ्यांची माहिती मिळाली. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी उंब्रज, औंध, बोरगाव, तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून विद्युत मोटारी चोरी केल्याची कबुली दिली. संशयितांनी चोरीचा मुद्देमाल पोलिसांना दिला. सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी संशयितांना अटक केली.
जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष तासगावकर, संतोष पवार, रवींद्र भोरे, फौजदार मदन फाळके, उत्तम दबडे, संतोष पवार, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.



























































