
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेले वचन अखेर कर्जमाफीची घोषणा करून पूर्ण केले आहे. सातारा जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2019 अखेर 60 हजार 398 खातेदारांचे 353 कोटी 70 लाख 41 हजार रुपये थकीत आहे. कर्जमाफी निर्णयामुळे जिल्ह्यातील 57 हजार 517 शेतकर्यांचा सातबारा कोरा होणार आहे. शेतकर्यांचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबर चिंतामुक्त करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कर्जमाफीची घोषणा करून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त केले आहे. याचा सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे 3 लाख 52 हजार 578 शेतकर्यांना पीक कर्ज वाटप केले आहे. यापैकी 60 हजार 398 शेतकर्यांकडे 353 कोटी 70 लाख 41 हजार रूपयांचे कर्ज थकीत आहे. सातारा जिल्हा बँकेकडून अल्प मुदत पीक कर्ज, मध्यम मुदत शेती कर्ज आणि दीर्घ मुदत शेती कर्ज दिले जाते. सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी शेती कामासाठी कर्ज घेतले आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
30 सप्टेंबर अखेर जिल्हा बँकेची 39 हजार 903 शेतकर्यांकडे अल्प मुदत कर्जाची 258 कोटी 79 हजार रूपये थकबाकी आहे. मध्यम मुदतच्या 12 हजार 190 खातेदारांकडे 49 कोटी 3 लाख 54 हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे. तर दीर्घ मुदत कर्जाचे 8 हजार 305 खातेदार असून त्यांच्याकडे 46 कोटी 66 लाख 8 हजार रूपये कर्ज थकीत आहे. यामध्ये 50 हजार रूपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या 28 हजार 668 शेतकर्यांचे 31 कोटी 83 लाख 35 हजार रूपये थकीत रक्कम आहे. 50 हजार ते 1 लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या 13 हजार 679 खातेदार शेतकर्यांचे 74 कोटी 27 लाख 77 हजार रूपये थकीत आहेत. 1 लाख ते दीड लाखांपर्यंत कर्ज काढलेल्या 9 हजार 103 शेतकर्यांचे 95 कोटी 50 लाख 1 हजार रूपये थकीत आहेत. दीड ते दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या 6 हजार 67 खातेदारांकडे 93 कोटी 37 लाख 80 हजार रूपये थकीत आहेत. अशा 50 हजार ते 2 लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या 57 हजार 517 शेतकर्यांचे एकूण 294 कोटी 98 लाख 93 हजार रूपये माफ होणार असल्याने या शेतकर्यांचा सातबारा कोरा होऊन शेतकरी चिंता मुक्त होणार आहेत.






























































