सातारा तालुक्यात मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतात काम करीत असताना अचानक मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सातारा तालुक्यातील पानमळेवाडी येथे घडली. लक्ष्मण हरिभाऊ गोरे (वय 68, रा. पानमळेवाडी, ता. सातारा) असे मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.

लक्ष्मण गोरे हे सकाळी दहा वाजता उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. उसाला पाणी दिल्यानंतर एका झाडाखाली ते बसले होते. याचवेळी मधमाश्यांचे पोळे अचानक उठले. मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तोंडावर, हातावर, डोक्यावर, पाठीवर माशांनी चावा घेतला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अशा अवस्थेतही ते शेतातून चालत रस्त्यावर आले. एका वाहनचालकाने त्यांना आपल्या वाहनात बसवून त्यांच्या घरी सोडले. त्यानंतर घरातल्यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.