
सातारा ते लातूर राज्यमार्ग पुसेगावातून जाणार की गावाबाहेरून रिंगरोड होणार हा बराच काळ भिजत पडलेला प्रश्न शेवटी निर्णयाप्रत आला आहे. हा महामार्ग पुसेगावातूनच जाईल, यावर एकमत झाले आहे. सोमवारी महावितरण, पाणीपुरवठा अधिकारी, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
पुसेगाव ही खटाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून, सेवागिरी देवस्थानमुळे संपूर्ण राज्यात हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. गावातून जाणाऱ्या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम वादामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. यासंदर्भात सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात ग्रामपंचायत, सेवागिरी देवस्थान पदाधिकारी, ग्रामस्थ, ठेकेदार कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराक जाधव, सरपंच विजय मसणे, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, सुरेशशेठ जाधव उपस्थित होते.
या बैठकीत गावातील रस्त्याचे पोलीस स्टेशनपर्यंतचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. तसेच पब्लिक स्कूलपासून पोलीस स्टेशनपर्यंत 9 मीटर रुंदीचा काँक्रीट रोड, दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड मीटर रुंदीची आरसीसी गटर बांधण्याचेही ठरविण्यात आले. त्यासाठी गावच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन आणि व्हॉल्क यंत्रणाही बदलण्यात येणार आहे. काही ठिकाणचे विद्युत पोलही हलविण्यात येणार आहेत.
पोलीस स्टेशनपासून सेवागिरी मंदिरापर्यंतचा पाचशे मीटरचा भाग जुन्या गावठाणात येतो. मोजणी करून त्या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाकडून अधिग्रहणाचा मोबदला मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना कित्येक दिवसांपासून खराब रस्ता, खड्डे, धूळ आणि काहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावाच्या दोन्ही बाजूंकडील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. गावातून जाणाऱ्या रस्त्याबद्दल विविध शक्यता वर्तविण्यात येत होत्या. रिंगरोड होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काहीही झाले तरी गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टने हालचाली गतिमान केल्या आहेत.
पाणीपुरवठ्याबाबत पर्यायी व्यवस्था करणार
पुसेगावातून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत काही ठिकाणी अडचणी आहेत. लोकप्रतिनिधींना या कामात काही मर्यादा पडतात. अशा वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरून मार्ग काढायची गरज आहे. रस्त्याच्या कामामुळे गावचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येईल. रस्त्याचे काम त्वरित व्हावे म्हणून पुसेगावकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सुरेश जाधव यांनी बैठकीत केले.


























































