सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे या वर्षी डिसेंबरमध्ये 100 विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश देता येईल. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून औपचारिक मान्यतेचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती या महाविद्यालयाचे डीन डॉ. संजय गायकवाड यांनी दिली.

सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णानगर येथे जलसंपदा विभागाच्या 64 एकर जागेत विस्तारित इमारत, वसतिगृह, इतर सुविधा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घालून कॉलेजच्या कामासाठी 419 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, असे डॉ. गायकवाड म्हणाले.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची प्रमाणित मानकांच्या परिपूर्ततेसाठी सातारा जिल्हा रुग्णालय, जम्बो कोविड हॉस्पिटल व सैदापूर येथील अरविंद गवळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीत 500 बेड्सचा कोटा आयोगाच्या निरीक्षणासाठी उपलब्ध करण्यात आला होता. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या त्रिसदस्यीय पथकाने जुलै महिन्यात विस्तारित इमारती, सहयोगी प्राध्यापक आस्थापना आकृतिबंध, प्रत्यक्ष जागेला भेट, इतर वैद्यकीय सुविधा व इतर तपशीलवार माहिती घेतली होती. वैद्यकीय महाविद्यालयासाठी मेडिकल ट्रस्टची स्थापना राज्य सरकारची परवानगी, राज्यस्तरीय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परवानगीनंतरच महाविद्यालयाचा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अंतिम मंजुरी मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

42 हजार चौरस फुटांच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेसाठी 13 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू होईल. आगामी काळात 150 विद्यार्थी क्षमतेनुसार सुविधांची उपलब्धता केली जाईल. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे नियोजन असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.