
पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱयांनी मानसिक छळ करून त्रास दिल्यासह शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची तक्रार शिक्षिकेने केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत विभागीय शिक्षण आयुक्तांसह जिल्हा परिषदेकडे निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी या शिक्षिकेने केली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी विशाखा समितीमार्फत सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
सातारा तालुक्यातील एक उपशिक्षिका महामार्गालगतच्या एका शाळेत कार्यरत आहे. या शिक्षिकेने आयुक्तांना निवेदन दिले असून, त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाळेत रुजू झाल्यापासून गटशिक्षणाधिकाऱयांचा मला त्रास सुरू झाला आहे. माझ्या पतीचे निधन झालेले असताना तुमचे मिस्टर कुठे असतात? तुमची बदली करू का? कोंढवलीला जाता का? चिंचणेरला येता का? असे प्रश्न विचारून गटशिक्षणाधिकाऱयांनी मानसिक खच्चीकरण केले.
31 जानेवारी 2020 रोजी गटशिक्षणाधिकारी अचानक दुपारी शाळेत आले. त्यांनी विद्यार्थ्यांची चौकशी न करता ‘यंदा पाऊस जास्त झाला आहे. उसाला तुरे आले आहेत,’ असे खोचक शब्दप्रयोग करीत एकटक पाहू लागले. शाळा सुटल्यानंतर चारचाकीने घरी सोडतो, असा आग्रह धरू लागले. 10 जून व 17 जून 2020 रोजी ते माझ्या घरी आले. माझ्या मुलीला बाहेर पाठवून, ‘सर्व तक्रारी मी निकालात काढणार आहे. तुला त्याचा काहीही त्रास होऊ देणार नाही. परंतु मी शरीरसुखाची अपेक्षा करीत आहे. त्यासाठी तू नकार देऊ नकोस. आपण जवळ आलो तर तुला शाळेत त्रास होणार नाही,’ असे म्हणत त्यांनी विनयभंग केल्याचे शिक्षिकेने तक्रारीत म्हटले आहे.
नोटिसा काढून शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांमार्फत माझी चौकशी करण्यात आली. कोरोनाकाळात वर्गातील मुलांची तपासणी घेऊन शैक्षणिक कामाबाबत नाचक्की करण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्याबाबत शिक्षणाधिकाऱयांकडे तक्रार अर्जही केल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित शिक्षिकेचा अर्ज प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांकडून प्राप्त झाला आहे. चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराबाबत शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
























































