सातारा लोकसभा पोटनिवडणूक 65.10 टक्के मतदान

956

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी उत्साहात ‘बंपर’ मतदान झाले. प्राथमिक आकडेवारीनुसार 65.10 टक्के मतदान झाले असले, तरी एकूण मतदान तीन महिन्यांपूर्वीच्या मतदानापेक्षा वाढणार आहे. हा वाढता टक्का कोणाची ‘दिवाळी’ करणार आणि कोणाचे ‘दिवाळे’ काढणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्या भवितव्याचा फैसला मतदानयंत्रात बंदिस्त झाला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर चारच महिन्यांपूर्वी विजय मिळविलेल्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील पोटनिवडणूक लागली होती. भाजपने सातारा जिल्हा हा दोन दशकांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने तो अभेद्य राखण्यासाठी पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली. खुद्द शरद पवार यांनी साताऱयावर लक्ष केंद्रित केले. तर, हा किल्ला भेदण्यासाठी भाजपनेही या ठिकाणी प्रचंड ताकद लावली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 रोजी साताऱयात विराट सभा झाली. त्यामुळे येथील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

येथील मतदानावर पावसाचे सावट होते. सोमवारी सकाळपासूनच वातावरणाचा नूर पालटला आणि पावसाने उघडीप दिली. त्यामुळे सकाळपासूनच सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. सकाळी नऊपर्यंतच्या पहिल्या दोन तासांत जेमतेम चार ते पाच टक्के मतदान झाले होते. नंतर मतदानाची गती वाढत गेली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 61.85 टक्के इतके मतदान झाले. एप्रिल 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात 60.33 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. त्याचा अन्वयार्थ लावला जात आहे. वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात येणाऱया सहा विधानसभा मतदारसंघांची मतदानाची टक्केवारी अशी- वाई – 61.57, कोरेगाव – 61.2, कराड उत्तर – 63.62, कराड दक्षिण – 65.47, पाटण – 59.3, सातारा-जावळी – 55.03 टक्के.

आपली प्रतिक्रिया द्या