#WorldSparrowDay – हरवली पाखरे…

>> सतिश केंगार

बदलत्या वेळेसोबतच पशुप्रेमी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी तळमळत आहेत. बेसुमार झाडांची अंधाधुंद कत्तली, मोबाइल टॉवर्समधून निघणार्‍या धोकादायक किरणोत्सर्गामुळे चिमण्या नामशेष होत आहेत. माणूस चिमण्यांपासून दुरावलाय, चिमण्यांना विसरलाय आणि म्हणूनच 20 मार्च हा दिवस ‘चिमणी दिन’ म्हणून साजरा करण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

बुलबूल पक्ष्यापेक्षा आकाराने थोडी लहान असलेली चिमणी हिंदुस्थान, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशात आढळते. गेल्या काही वर्षांत शहरातूनच नव्हे, तर गावातूनही तिचे अस्तित्त्व नाहीसे होऊ लागले आहे. पूर्वीच्या घरांमध्येही चिमण्या घरं बांधत. घराच्या वास्तुकामातच त्यांना कुठेतरी फटी सापडत. आता नवीन प्रकारच्या घरांमध्ये तशा जागा सापडत नाहीत. त्यांना पाहिजेत त्या प्रकारची झाडं घरं बांधायला सापडत नाहीत. कारण आता मुंबईतील 50 टक्के झाडं मूळची इथली नाहीत. आणि शहरीकरण एवढं भरमसाट झालं आहे की नवीन सिमेंटचं जंगल त्यांना भावत नाही.

एकेकाळी पहाटे आपल्या घरच्या खिडकीत दिसणारी चिमणी आज गुगलवर शोधून पाहावी लागत आहेत. अशातच आपल्या पुढच्या पिढीला जेव्हा आपण चिऊ-काऊच्या गोष्टी सांगू तेव्हा त्यांना ती इवलीशी चिमणी माहित असेल का? हा प्रश्न पडतो.

ती इवलीशी चिमणी

आज बऱ्याच वर्षानंतर खूप चिमण्या पाहिल्या मी,
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर,

घराच्या छतावर, शाळेच्या खिडकीतून दिसायची जी रोज,
ती चिमणी आता गुगलवर शोधून पाहावी लागते,

मोबाईलच्या ध्वनिलहरींमुळे,
चिमण्या नाहीश्या होऊ लागल्या,
तरी मानवा तू थांबला नाहीस,
आणखीन मोबाईल टॉवर उभारु लागलास,

काय मागितलं होत रे तिने तुला,
फक्त घरटं करण्याइतपत एक छोटीशी जागा,
खायला थोडे दाणे,
चोच ओलं करण्याइतपत पाणी,
आणि जगायला स्वच्छ हवा,
सिमेंटचे हे जंगल बांधून,
तू तिच्यापासून तिचे झाडही हिरावून घेतले,

आता दिसत नाही आकाशात चिमण्या,
मनाला प्रश्न पडतो,

विकसनशील जगातील या नवीन पिढीला,
चिऊ-काऊच्या गोष्टीतील,
ती इवलीशी चिमणी माहित असेल का?

 

आपली प्रतिक्रिया द्या