मालवणात 26 जानेवारीला ‘शतकोत्सव सुंदरी’ स्पर्धा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण नगरपरिषदेचा शतक महोत्सवी सोहळा 25 ते 27 जानेवारी या कालावधीत होणार असून यानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रमांबरोबरच चित्ररथ, वेशभूषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, खेळ पैठणीचा, शतकोत्सव सुंदरी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मालवण नगरपरिषदेच्या शतक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला 24 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता भव्य शोभा यात्रा निघणार असून या शोभायात्रेच्या निमित्ताने चित्ररथ स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. चित्ररथ स्पर्धेतील प्रथम विजेत्या चित्ररथास 15 हजार रुपये तर द्वितीय विजेत्यास 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच दोन गटात घेण्यात येणाऱ्या वेशभूषा स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या तीन क्रमांकाना अनुक्रमे तीन हजार,दोन हजार,आणि एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. ही वेशभूषा स्पर्धा 14 वर्षांखालील आणि 14 वर्षावरील अशा दोन गटात होणार आहे.

25 जानेवारीला सकाळी 11 वाजता नगरपरिषद सभागृहत मालवणी खाद्यपदार्थांवर आधारित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शाकाहारी आणि मांसाहार पध्दतीची असेल. शाकाहारीसाठी तांदळापासून बनविलेला पदार्थ तर मांसाहारीसाठी माशांपासून बनविलेला पदार्थ असे विषय देण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे दोम, दीड आणि एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

26 जानेवारीला बोर्डिंग ग्राऊंड येथे दुपारी 3.30 वाजल्यापासून मालवण शहर मर्यादित महिलांसाठी खेळ पैठणीचा हा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे. यातील प्रथम विजेत्या महिला स्पर्धकास आकर्षक पैठणी व सन्मानचिन्ह तर दुसऱ्या स्पर्धकास सोन्याची नथ व सन्मानचिन्ह तर तृतीय विजेत्यास घड्याळ व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. रात्री 7 वाजता खुली शतकोत्तरी सुंदरी स्पर्धा होणार असून 18 वर्षावरील सर्व महिलांसाठी ही स्पर्धा खुली राहणार आहे. यातील प्रथम विजेत्या शतकोत्तरी सुंदरीस 15 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय विजेत्या सुंदरीस 10 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तृतीय विजेत्या सुंदरीस 5 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी स्वतःच्या प्रभागातील नगरसेवकांशी 22 जानेवारीपर्यंत संपर्क साधून नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी नगरसेविका पुजा सरकारे, नगरसेविका सेजल परब व कर्मचारी महेश परब यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.