तेव्हाच प्रतिनिधी पाठवून चर्चा करायला हवी होती, शेतकऱ्याच्या मृत्यूवरून सत्यजित तांबेनी सरकारला फटकारले

उन्हातान्हात मैलोन्मैल चालत आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमधील पुंडलिक जाधव या 55 वर्षीय शेतकऱ्याचा शुक्रवारी तडफडून मृत्यू झाला. यावरून अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. सरकारने वेळीच प्रतिनिधी पाठवून चर्चा करायला हवी होती, हातावर पोट असणाऱ्या शेतकऱ्यांना सात दिवस उन्हातान्हांत पायी चालत आंदोलनात त्रास सहन करावा लागला… हे दुर्दैव आहे, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

”सात दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात काल पुंडलिक जाधव या शेतकरी बांधवाचा मृत्यु झाला, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर या आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हाच त्यांच्याकडे प्रतिनिधी पाठवून चर्चा करण्याची गरज होती. हातावर पोट असणाऱ्या शेतकऱ्यांना सात दिवस उन्हातान्हांत पायी चालत आंदोलनात त्रास सहन करावा लागला हे दुर्दैव आहे. पण निदान आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि त्यांना व्यवस्थित घरी पोहोचवण्याची जबाबदारी घ्यावी ही विनंती”, असे सत्यजित तांबे यांनी ट्विट केले आहे.

केंद्र सरकारचे जाचक कृषी कायदे रद्द करा, कांद्याला हमीभाव, आदिवासींच्या जमिनी नावावर करा आदी मागण्यांसाठी नाशिकच्या दिंडोरीपासून सुरू झाला होता. सरकारदरबारी मागण्या ठोसपणे मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांच्या लाल वादळाचा पडाव वासिंद येथे पडला होता. गुरुवारी या मोर्चातील पुंडलिक जाधव यांना रात्री अचानक उलटय़ांचा त्रास व अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना शहापूर रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.