अंगडीया खंडणी वसुली प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगडीया खंडणी प्रकरणातील फरार आरोपी उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या बहिणीचे पती आणि युपीतील सहाय्यक जीएसटी आयुक्त आशुतोष मिश्रा (38) यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. सौरभ त्रिपाठी यांनी मुंबईतून हवाला मार्फत पाठवलेली रक्कम मिश्रा यांनी तिकडे स्विकारल्याचे तपासात समोर आल्याने अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सुत्राकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या पोफळवाडीतील अंगडीयांकडून पैसे उकळल्या प्रकरणी अंगडीया असोसिएशनच्या सदस्यांनी तक्रार दिल्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याच्या तिघा अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली. मात्र गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून उपायुक्त सौरभ त्रिपाठी पसार झाले. दरम्यान, तपासात त्रिपाठी यांचाही सहभाग समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांनाही आरोपी दाखवले. तेव्हापासून गुन्हे शाखा सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेत आहेत. मात्र अजून त्रिपाठी यांचा थांगपत्ता लागलेला नाही. दरम्यानच्या काळात पोलिसांनी लखनौच्या गोमतीनगरयेथील त्रिपाठी यांच्याघरी घरकाम करणारा पप्पु गौड याला देखील अटक केली. त्रिपाठी यांनी पाठवलेले रोकड गौड याने घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिस पथकाने पुन्हा गोमतीनगर येथे जाऊन त्रिपाठी यांचा शोध घेतला. मात्र त्रिपाठी यांचे गोमतीनगर येथील राहते घर बंद आहे.

त्रिपाठी यांनी हवाला मार्फत जो पैशांचा व्यवहार केला त्यात त्यांचे भावोजी आशुतोष मिश्रा यांचा देखील सहभाग समोर आल्याने पोलिसांनी युपीतल्या बस्तीमधून त्यांना अटक केली. त्यांना ट्रांन्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात येत आहे. मिश्रा यांनी त्रिपाठी यांनी पाठवलेले पैसे स्वीकारल्याचे सांगण्यात येते.फरार असलेल्या सौरभ त्रिपाठी यांनी पप्पु गौड याच्या नावे असलेल्या सिमकार्डचा पैशांचा व्यवहार करण्यासाठी वापर केल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते. तसेच त्रिपाठी यांनी मुंबईतून लाखो रुपये युपीला पाठवल्याचे देखील समजते.