Save INS घोटाळा; संजय राऊत यांचा राजभवनाला इशारा, काही चुकीचे काम केले तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हे सोमय्या पिता-पुत्र मेहुल चोकसी आहे तिथे तर नाही गेले ना? असा सवाल करतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की एक टोळी राजभवनात बोगस पुरावे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी राजभवनाला इशारा देतो आहे जर काही चुकीचे काम केले तर राजभवनाची उरलीसुरली प्रतीमाही धुळीस मिळेल. राजभवनाने या राष्ट्रविरोधी कृत्यात सहभागी होऊ नये, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

पत्रकारांनी संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटवरून प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपली बाजू मांडली. ‘INS विक्रांतच्या नावावर घोटाळा झाला आहे. सेव्ह विक्रांत घोटाळा, चिटिंग, मिस यूज ऑफ फंड, हा घोटाळा छोटा नाही असं दिसतं आहे. याची व्याप्ती मोठी आहे. पूर्ण महाराष्ट्रातून पैसे गोळा करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या, नील किरीट सोमय्या आणि त्यांची टोळी आहे. ही माफीया टोळी आहे. हे बिल्डरांकडून आणि सामान्य जनतेकडून पैसे गोळा करतात. सेव्ह विक्रांतच्या नावावर राज्य आणि राज्याच्या बाहेरून देखील पैसे गोळा करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. अनेकांना चौकशीसाठी बोलवले जात आहे. हे दोन ठग कुठे आहेत. त्यांच्याबद्दल भाजप काही का बोलत नाही? ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. ते अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण ते काही शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे हे परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत असा दाट संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला. या दोघांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कारण मेहुल चोकसी आणि सोमय्यांचा फार पूर्वी पासून घनिष्ट संबंध आहे. मेहुल चोकसी आहे तिथे तर नाही गेले? त्यांची एक टोळी इथे बोगस पुरावे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी राजभवनाला इशारा देतो आहे जर काही चुकीचे काम केले तर राजभवनाची उरलीसुरली प्रतीमाही धुळीस मिळेल’, असे राऊत म्हणाले.

‘मुंबई पोलीस अपराध्यांना जिथे असेल तिथून पकडून आणेल. जनतेचा पैसा यांनी लुटला आहे त्याचा हिशोब यांना द्यावाच लागेल’, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.