चित्रपट निर्मात्याची सयाजी शिंदे यांच्या विरोधात वाई पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करण्याचे मान्य करून त्यासाठी पैसे घेतले. मात्र, त्यांनी चित्रपटात काम केले नाही व पैसेही परत न देता फसवणूक केल्याचा आरोप वाई येथील चित्रपट निर्माते शिवाजी ऊर्फ सचिन बाबूराव ससाणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. मधुकर फल्ले यांच्याकडे ही रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ससाणे यांनी केली.

ससाणे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी चित्रपट करायचा असल्याचे ठरवून त्यासाठी अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांना घेण्यासाठी शिंदे यांचे सहकारी मधुकर फल्ले यांच्यासोबत चर्चा केली. प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनाही चित्रपटाची क्रीप्ट सांगण्यात आली. कामाचा मोबदला म्हणून प्रतिदिवस एक लाख रुपये घेणार असल्याचे ठरले. पाच दिवसांचे काम असल्याने त्या बदल्यात रोख चार लाख रुपये व एक लाख रुपये खात्यावर पाठविण्यात आले. पैसे देताना सयाजी शिंदे यांनी व्हाउचरवर सह्या केल्या आहेत. मात्र, व्यवहाराबाबत करार झाले नाही. चित्रपटाचे काम सुरू झाल्यानंतर स्क्रीप्टमध्ये सयाजी शिंदे यांनी मोठय़ा प्रमाणात बदल करण्यास सांगितल्याने ही बाब पटली नाही. यातूनच पुढे सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करणार नसल्याचे सांगितले व पाच लाख रुपये परत देतो, असे सांगितले. याबाबतचे मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग आहे. या प्रकरणाबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सातारा शाखेच्या वतीने जिल्हा पोलीसप्रमुखांना पत्र देण्यात आले असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.