लातूर – एसबीआय बँकेच्या ठेवीवर परस्पर कर्ज खाते काढून फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील एसबीआय बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवीवर परस्पर ऑनलाईन कर्ज खाते काढून तब्बल 2 लाख 14 हजार 259 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलापूर येथील दिपककुमार शर्मा याच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी सुधा सर्वोत्तम कुलकर्णी रा.दादोजी कोंडदेवनगर रिंगरोड लातूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या मोबाईलवर दिपककुमार शर्मा रा. बेलापूर याचा फोन आला. एसबीआयच्या हेडक्वार्टरमधून बोलतोय असे त्याने सांगितले. तुमच्या खात्यामधून सुबोध शर्माच्या नावे 20 हजार, 15500 असे एकूण 35500 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत का अशी विचारणा केली. त्यांनी 35485 रुपये खात्यामधून डेबीट झाल्याचे सांगितले. त्याने 20 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमाही केले व त्यानंतर लगेचच 10 हजार रुपये त्यांच्या खात्यामधून डेबीट झाल्याच्या मेसेच आला. त्यामुळे त्यांनी एसबीआय कस्टमर केअरला फोन करून खाते ब्लॉक करण्यास सांगितले. दोन दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे नंतर त्यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता त्यांच्या दोन ठेव खात्यावर दिपककुमार शर्मा रा. बेलापूर याने परस्पर कर्ज खाते उघडून त्यावर 214259 रुपये काढून घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलीसांनी दिपककुमार शर्मा रा.बेलापूर याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.